आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पुन्हा अनधिकृत होर्डिंग्जची एकच गर्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वी शहरात अनधिकृत होर्डिंग्ज हटाव मोहीम सुरू केली होती. परंतु पंधरा दिवसांनंतर शहरातील परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. अनेकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रस्ते व चौकाचौकात अनधिकृत होर्डिंग्ज उभे केले आहेत. त्यामुळे मनपाची होर्डिंग्ज हटाव मोहीम केवळ नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांनी एका दिवसात अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या नगर महापालिकेने शहरात होर्डिंग्ज हटाव मोहीम सुरू करून विविध भागांतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवले होते. अतिक्रमण विभागातील 10 ते 15 कर्मचारी व संबंधित प्रभाग कार्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक होर्डिंग्ज काढण्यात आले. परंतु पंधरा दिवसांनंतर सावेडी, झेंडीगेट, मध्यवर्ती शहर अशा विविध भागांत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांचे वाढदिवस, विविध कार्यक्रम, उत्सव, तसेच शैक्षणिक संस्था आणि खासगी शिकवण्यांच्या होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसांचे फलक तर वर्षभर शहरात झळकत असतात.

सध्या शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देणार्‍या होर्डिंग्जची दिल्लीगेट, कोर्ट परिसर, चितळे रोड, वाडिया पार्क, माळीवाडा, बसस्थानक, नगर कॉलेज, न्यू आर्टस् कॉलेज, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, डी. एस. पी. चौक आदी ठिकाणी गर्दी झाली आहे. न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे होर्डिंंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील सुमारे 25 ते 30 लहान-मोठय़ा चौकांचेही मोठय़ा प्रमाणात विद्रुपीकरण झाले आहे. अधिकृतपणे होर्डिंग्ज लावण्यासाठी शहरात 72 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. परंतु त्यासाठी परवानगी घेऊन पैसे मोजावे लागत असल्याने अनेकजण अनधिकृतपणे होर्डिंंग्ज लावणे पसंत करतात. मनपाचे कर्मचारी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.

न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने केवळ नावापुरती होर्डिंग्ज हटाव मोहीम सुरू केली. केवळ दोन दिवस मोहीम सुरू ठेवून कारवाईचा दिखाऊपणा करण्यात आला. मात्र अनधिकृत होर्डिंंग्जला आळा घालण्यासाठी कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेकांनी पुन्हा अनधिकृत होर्डिंग्ज उभे केले आहेत.