आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँटोन्मेंट नाक्यांवरही बेसुमार लूट; परप्रांतीय ट्रकचालकांकडून दहापट वसुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भिंगार छावणी मंडळाच्या प्रवेशकर नाक्यांवर देशभरातून येणार्‍या ट्रकचालकांची अक्षरक्ष: लूट सुरू आहे. नगरसारखा त्रास कुठेही होत नसल्याची ट्रकचालकांची प्रतिक्रिया नगरची बदनामी करण्यास पुरेशी ठरते आहे. नियमापेक्षा दहापट पैसे वाहनचालकांकडून उकळले जातात. नकार देणार्‍यांना शिवीगाळ व मारहाणीचाही सामना करावा लागतो. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारे छावणी मंडळ अर्थपूर्ण डोळेझाक करून लुटीला सर्मथन देत आहे.

छावणी मंडळाने औरंगाबादच्या ओंकारा कन्स्ट्रक्शनला भिंगार परिसरात 12 ठिकाणी वाहन प्रवेशकर वसूल करण्याचा ठेका 2009 मध्ये दिला. त्यातून मंडळाला वर्षाला 3 कोटी 56 लाख रुपये मिळतात. छावणी मंडळाने 2009 मध्ये वाहन प्रवेशकराऐवजी वाहन परवाना कर वसुलीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला अजून मंजुरी मिळालेली नाही. ओंकारा कन्स्ट्रक्शन व छावणी मंडळाचा वाद न्यायालयात गेल्याने 2009 पासून ओंकाराकडून प्रवेशकर वसूल करण्यात येत आहे. ठेक्याची रक्कमही सुरूवातीला ठरलेली कायम ठेवण्यात आली आहे. परवाना कराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत काहीही करता येणार नाही, अशी हतबलता छावणी मंडळ व्यक्त करत आहे.

नियमानुसार बस, ट्रक या वाहनांना 15 रुपये, तर लहान वाहनांना 5 व 10 रुपये प्रवेश कर आकारण्यास परवानगी आहे. तसे फलक नाक्यांवर लावण्यात आले आहेत. तथापि, हे फलक केवळ दिखाव्यासाठी आहेत. प्रवेशकर वसूल करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या गुंडांच्या टोळ्यांपुढे परप्रांतीयच नव्हे, तर नगर जिल्ह्यातील ट्रकचालकही हतबल होतात. नियमानुसार एका ट्रकचालकाला 15 रुपयांची एक पावती देणे आवश्यक असताना नाक्यांवरील टोळ्या हे नियम धाब्यावर बसवून 10 पावत्या देतात व दीडशे रुपये जबरदस्तीने वसूल करतात.

दिवसाढवळ्या ही लूट सुरू आहे. रात्री नाक्यांचे स्वरूप पालटते. हातात लाकडी दांडके घेतलेल्या नाक्यावरच्या टोळ्या रस्त्यावर उतरतात. दीडशे रुपयांची वसुली तर होतेच, शिवाय वरखर्चासाठी चालकांच्या खिशावर हात मारला जातो. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या ट्रकचालकांनी ही व्यथा ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली. मागील पंधरा वर्षांपासून नाक्यांवर हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. नाक्यांवर काम करणार्‍या टोळ्या लखपती, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे कोट्यधीश झाले आहेत.

या आधीचे पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या काळात वाहनचालकांना होणारा त्रास थोडा कमी झाला होता. त्यांच्या बदलीनंतर टोळीचा उपद्रव पुन्हा वाढला. देशभरात कुठेही असा त्रास होत नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. छावणी मंडळाच्या नाक्यांवरील हा त्रास संपतो न संपतो, तोच महापालिकेच्या पारगमन नाक्यांवरच्या पठाणी वसुलीला तोंड द्यावे लागते. बहुतांश चालकांना आता याची सवय झाली आहे. शिवीगाळ व मारहाण टाळण्यासाठी ते दीडशे रुपये निमूटपणे देतात. रात्रीच्या वेळी होणारी लूट लक्षात घेऊन रात्री जाण्याचे ते टाळतात.

पारगमन नाक्यांवर पिळवणूक सुरूच..
पारगमन नाक्यांवर ट्रकचालकांची कशी पिळवणूक होते, याचे वास्तव ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी सर्वांसमोर ठेवले होते. ‘दिव्य मराठी’च्या टीमने मंगळवारी पुन्हा सोलापूर नाक्यावर पाहणी केली असता ट्रकचालकांकडून सरसकट 250 रुपयांची वसुली सुरूच होती. मनपाचे पर्यवेक्षक प्रफुल्ल लोंढे नाक्यावर उपस्थित नव्हते. दूरध्वनीवरून संपर्क साधला असता लोंढे यांनी नाक्यावर सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. आम्ही नाक्यावरच असून ट्रकचालकांकडून सरसकट 250 रुपये वसुली सुरू असल्याचे सांगताच गडबडून गेलेल्या लोंढे यांनी मी लग्नसमारंभात असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

बिहारपेक्षा वाईट परिस्थिती
गुंडगिरी व दहशतीमुळे बिहार कुप्रसिद्ध आहे, पण बिहारपेक्षा वाईट स्थिती नगरमध्ये आहे. बळजबरीने दहापट वसुली केली जाते. मी विविध राज्यांत ट्रक घेऊन जातो, पण नगरसारखी वाईट वागणूक कुठेही मिळत नाही.’’ नईम हैदर, ट्रकचालक, बिहार.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिल्लीत
छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. तक्रारी आल्यास संबंधित ठिकाणी भेट देऊन कारवाई केली जाते, अशी माहिती मंडळाचे कार्यालयीन अधीक्षक एस. एस. शिरकुळ यांनी दिली.

पैसे नाही दिले, तर शिवीगाळ व मारहाण
"नियमानुसार पंधरा रुपये देण्याचा प्रयत्न केला, तर शिवीगाळ व मारहाण करण्यात येते. खिशातून पैसे हिसकावून घेतले जातात. गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने वाद घालणे निर्थक ठरते. जीव मुठीत धरून नाके ओलांडावे लागतात. रात्री होणारी लूट टाळण्यासाठी शक्यतो रात्रीचा प्रवास टाळतो.’’
-शिवशक्ती, ट्रकचालक तामिळनाडू.

स्वकष्टाची कमाई जाते गुंडाच्या हाती..
"पंधरा पावत्या दिल्या जात असल्याने कंपनी किंवा ट्रकमालक याचे पैसे देत नाहीत. स्वकष्टाची कमाई गुंडांच्या हाती द्यावी लागते. छावणी मंडळांच्या नाक्यावर 135, तर पारगमन नाक्यावर 190 रुपये अतिरिक्त भरावे लागतात. दोन्ही ठिकाणी सव्वातीनशे रुपये खिशातून भरावे लागत असल्याने एक दिवसाची कमाई जाते.’’
- रणजित जाट, ट्रकचालक, राजस्थान.

पैसे निकाल, नहीं तो दुँगा एक खिंचके...
"औरंगाबाद नाक्यावर माझ्यासह सर्व सहकार्‍यांकडून सरसकट 250 रुपये घेण्यात आले. काही बोलायच्या आतच नाक्यावरील कर्मचार्‍यांनी ‘पैसे निकाल, नही तो दुँगा एक खिंचके’ अशी धमकी दिली. नाईलाजाने पैसे द्यावे लागले. परराज्यातील असल्याने नाक्यावरील कर्मचार्‍यांची मनमानी सहन करावी लागते.’’
-राजेंद्रन, ट्रकचालक, तामिळनाडू.