आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा नळजोडांमुळे नगरकरांना मिळेना पाणी, हंडाभर पाण्यासाठी नळाला लावतात विद्युत मोटारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरात वसाहतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्या तुलनेत पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली नाही. त्यातच बेकायदा नळजोडांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याने अधिकृत नळजोड असलेल्या नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीत हंडाभर पाण्यासाठी देखील विद्युत मोटारी लावल्या जातात. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. विद्युत मोटारी व अनधिकृत नळजोडांमुळे नगरकरांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.
रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहरातील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यात जातात. खड्ड्यात गेलेले रस्ते बाहेर काढण्यासाठी दुरुस्तीवरच कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पुन्हा पुढील वर्षी दुरुस्त केलेल्या रस्त्यांना खड्डे पडतात हे दृष्टचक्र सुरूच आहे. त्यातच पाणीपुरवठा देखील सातत्याने विस्कळीत होत असल्याने नगरकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. नगरकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा देण्यासाठी फेज दोन योजना आणली. पण, ही योजना कार्यान्वित केव्हा होणार याचा अंदाज सध्या तरी कोणीही बांधायला तयार नाही. सत्ताधारी ही योजना लवकरच पूर्ण करू, असे सातत्याने आश्वासन देतात. तथापि लवकर म्हणजे आणखी किती दिवस पाण्यासाठी वाट पहायची, असा प्रश्न नगरकरांमधून उपस्थित केला जात आहे.
दुरुस्ती व देखभालीसाठी बऱ्याचदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित केला जातो. तसेच विळद घाटात बऱ्याचवेळा जलवाहिनीला गळती लागते त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होतो. शहरात सुमारे 45 हजार 549 अर्धा इंची अधिकृत कनेक्शन आहेत. पण अनधिकृत किती? याचा शोध सध्यातरी लागलेला नाही. अनधिकृत नळजोड अधिकृत नळांचे पाणी पळवत असल्याने नळाला कमी दाबाने पाणी येते.

या पाण्यात दैनंदिन पाण्याची गरज भागत नसल्याने नागरिकांकडून विद्युत मोटारीचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या कुटुंबांकडे मोटारी नाहीत, त्यांच्या नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नगरकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कारवाई मोहीम राबवा
शहरात बेकायदा नळजोडांचे वाढते प्रमाण अडचणीचे ठरले आहे. बऱ्याचवेळा पाऊण इंची कनेक्शनची नोंद करून प्रत्यक्षात एक इंचचे कनेक्शन घेतले जाते. त्यातच विद्युत मोटारी लावून पाणी उपसा केला जातो. त्यामुळे काही भागात शेवटच्या नळाला पाणीच येत नाही. याप्रकरणी महापालिकेने मोहीम हाती घेऊन बेकायदा नळजोडधारकांवर कारवाई करावी.ह्व एम. डी. गोसावी, नागरिक.
श्वेतपत्रिका काढावी
महापालिकेला उपलब्ध होणारे पाणी शहराला पुरेसे आहे. तथापि वितरण व्यवस्थेत अडच आहे. अनधिकृत कनेक्शन वाढल्यामुळे कमी दाबाने पाणी मिळते. नागरिकांना मोटारी लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. याला महापालिका जबाबदार असून त्यांनी चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड अपडेट केले नाही. त्यामुळे या व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढावी.जयप्रकाश संचेती, निवृत्त कार्यकारी अभियंता.