आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदेशीर पदोन्नतीचा घेतला १४ वर्षे लाभ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पदोन्नतीसाठी पात्र नसताना महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता कल्याण बल्लाळ हे गेल्या चौदा वर्षांपासून बेकायदेशीरपणे पदोन्नतीचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे बल्लाळ यांना ज्या पदावर पदोन्नती देण्यात आली, ते पद सरळ सेवेने विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी राखीव आहे. या बेकायदेशीर पदोन्नतीबाबत नगरविकास विभाग व विभागीय आयुक्तांनी मनपा आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. परंतु आयुक्त विजय कुलकर्णी यांची बल्लाळ यांच्यावर विशेष कृपा असल्याने हा अहवाल अद्याप दिलेला नाही.

वीस वर्षांपूर्वी नगरपरिषदेत सबओव्हरसियर पदावर रुजू झालेल्या बल्लाळ यांना अल्पावधीतच कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली. नगरपालिकेच्या िबंदू नामावलीनुसार कनिष्ठ अभियंत्याची पाच पदे मंजूर होती. त्यापैकी चार पदे भरली असून एक रिक्त पद सरळ सेवेने विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी राखीव होते. त्यामुळे या पदावर बल्लाळ यांना पदोन्नती देणे संयुक्तिक होणार नाही, असा ऑफिस रिपोर्ट तत्कालीन नगरपरिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, या रिपोर्टमध्ये खाडाखोड करून बल्लाळ यांना पदोन्नती देण्यात आली. महापालिकेकडे या बेकायदेशीर पदोन्नतीची फाईलच सध्या आढळून येत नाही. त्यामुळे बल्लाळ सलग चौदा वर्षांपासून बेकायदेशीर पदोन्नतीचा लाभ घेत आहेत. कनिष्ठ अभियंता हे पद विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही करणे आवश्यक असताना मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तत्कालीन नगरपरिषदेने बल्लाळ यांची केलेली पदोन्नती ही तात्पुरत्या स्वरूपाची होती. तात्पुरती पदोन्नती तीन वर्षांपेक्षा अधिक काळ देता येत नाही. विभागीय निवड समितीने हे पद भरल्यास बल्लाळ यांना पुन्हा पदावनत करण्यात यावे, असा ठराव तत्कालीन नगरपरिषद अध्यक्षा लता लोढा यांनी केलेला आहे. या ठरावासाठी सुचक म्हणून लियाकत शेख, तर अनुमोदक म्हणून किशोर डागवाले आहेत. त्यामुळे बल्लाळ यांची पदोन्नती बेकायदेशीर असून यासंदर्भात तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह नगरविकास विभाग व विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
बल्लाळ यांच्या बेकायदेशीर पदोन्नतीबाबत चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभाग व विभागीय आयुक्तांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत. परंतु आयुक्त कुलकर्णी यांची विशेष कृपा असल्याने बल्लाळांच्या विरोधात अद्याप अहवाल सादर केलेला नाही. तत्कालीन आयुक्त संजय काकडे यांनी बल्लाळ यांची बांधकाम विभागात बदली केली होती, परंतु तीन महिन्यांत बल्लाळ पुन्हा आपल्या टेबलावर परतले. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने बल्लाळ यांची बांधकाम व पाणीपुरवठा विभागात बदली केली, परंतु राजकीय वरदहस्त व आयुक्तांच्या कृपेने बल्लाळ पुन्हा हजर झाले आहेत.

"निर्ढावलेले' बल्लाळ
बदली होऊनही बल्लाळ यांनी बांधकाम व पाणीपुरवठा विभागात काम केले नाही, असे पत्र दोन्ही विभागप्रमुखांनी आस्थापना विभागाला दिलेे आहे. त्यानुसार बल्लाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांना निलंबित करून विभागीय चौकशी करावी, चौकशी अधिकारी म्हणून मुख्यलेखापरीक्षक एस. एस. अनारसे व सादरकर्ता अधिकारी म्हणून शहर अभियंता नंदकुमार मगर यांची नेमणूक करावी, असा अहवाल आस्थापना विभागप्रमुखांनी आयुक्तांना सहा महिन्यांपूर्वी दिला आहे. उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनीही या अहवालावर बल्लाळ हे अतिशय "निर्ढावलेले' असून गेल्या दहा महिन्यांपासून ते कोणत्याही एका विभागात काम करत नसल्याचा शेरा दिला. परंतु आयुक्त बल्लाळ यांना पाठीशी घालण्यासाठी फेरप्रस्ताव व चर्चा करण्याच्या सूचना करत आहेत.

आयुक्तांकडून बक्षिसी
पदोन्नतीसह टीडीआर गैरव्यवहार व परदेशवारी प्रकरणीदेखील बल्लाळ यांची लाचलुचपत विभागमार्फत चौकशी सुरू आहे. परदेशवारीबाबत आस्थापना विभागाने बल्लाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु त्याबाबतही आयुक्तांनी बल्लाळ यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. मात्र, बल्लाळ यांच्याबरोबर परदेशवारीला जाणाऱ्या मनपाच्याच दोन तत्कालीन सहायक नगररचना अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आयुक्त कुलकर्णी यांचे बल्लाळ यांच्यावर विशेष प्रेम असल्याचे स्पष्ट होते. बल्लाळ यांच्या टीडीआर गैरव्यवहारप्रकरणी नगररचना संचालकांनी मनपा आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नऊ महिन्यांपूर्वी दिलेले आहेत. आयुक्तांनी या आदेशाला केराची टोपली दाखवून उलट बल्लाळ यांची पुन्हा नगररचना विभागात बदली करून बक्षिसी दिली.

...तर न्यायालयात जाणार
-बल्लाळ यांच्या बेकायदेशीर पदोन्नतीबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांसह नगरविकास विभाग व विभागीय आयुक्तांकडे केली आहे. मात्र, आयुक्त कुलकर्णी बल्लाळ यांना पाठीशी घालत आहेत. यासंदर्भात आयुक्तांनी कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.''
शाकीर शेख, तक्रारदार.
आयुक्तांना अहवाल दिला
-बल्लाळ यांची परदेशवारी, तसेच बदली प्रकरणी आयुक्तांना अहवाल सादर केलेला आहे. बल्लाळ यांच्या पदोन्नतीबाबत अभिलेखाची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर पदोन्नतीबाबतही आयुक्तांना लवकरच अहवाल सादर करण्यात येईल. याबाबत आयुक्तच निर्णय घेतील.''
अंबादास सोनवणे, आस्थापना प्रमुख, मनपा.