आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ पकडला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - तालुक्यातील भांबोरे येथे शालेय पोषण आहाराचा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तीनशे किलो तांदूळ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रविवारी पकडण्यात आला.
राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागातील विद्यार्थांना शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा पुरवठा करते. मात्र, या तांदळाची काळ्या बाजारात परस्पर विक्री केली जाते. भांबोरे येथील सिद्धेश्वर विद्यालयातील पोषण आहाराचा तांदूळ एका टेम्पोत भरून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय ग्रामस्थांना आला. त्यांनी चालकाला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे ग्रामस्थांचा संशय आणखीनच बळावला.
त्यानंतर ग्रामस्थांनी गाडीच्या चाकातील हवा सोडून देऊन याबाबतची माहिती तहसीलदार, पोलिस व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला दिली. या प्रकारानंतर पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत राजेंद्र रणदिवे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
विद्यालयाकडून खुलासा मागवला - या तांदळाबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडून खुलासा मागवला आहे. माध्यमिक विभागाला उचित कारवाईसाठी सविस्तर अहवाल तातडीने पाठवला जाईल. दोषींवर कठोर कारवाईची शिफारस केली जाईल.’’ - बाळकृष्ण कळमकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी.
तांदळाला घूस लागली म्हणून हलवला - तांदळाला घूस लागल्याने तांदूळ आणखी खराब होऊ नये यासाठी हा तांदूळ अन्यत्र हलवणे गरजेचे होते त्यामुळे तो बाहेर काढला. - मारुती ठोंबरे, पर्यवेक्षक.
मुख्याध्यापकांची चौकशी करावी - आढळून आलेल्या तांदळाबाबत मुख्याध्यापक उडवाउडवीची उत्तरे देतात. रविवारी घडलेल्या गैरप्रकाराला ते पाठीशी घालत आहेत. मुख्याध्यापकाची चौकशी करून कारवाई करावी.’’ - नवनाथ होलम, सरपंच.