आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बेकायदा कत्तलखान्यांवर राहणार मनपाचा ‘वॉच’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रीय हरित लवादाच्या दणक्यानंतर महापालिका प्रशासनाने बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत लहान-मोठ्या ७८ बेकायदा कत्तलखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यापैकी दहा कत्तलखान्याला सील ठोकण्यात आले. हे कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाहीत, यासाठी मनपाचा वॉच असेेल.
कोणतीही परवानगी नसताना हे कत्तलखाने राजरोस सुरू आहेत. बुरूडगाव कचरा डेपोच्या निमित्ताने या कत्तलखान्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कत्तलखान्यातील टाकाऊ मांस कचरा डेपोत टाकण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने मनपाची चांगलीच कानउघाडणी केली. कचरा डेपोतील अॅनिमल वेस्टचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावून बेकायदा कत्तलखाने बंद करण्याचे आदेश लवादाने दिले. या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागाने लहान-मोठ्या ७८ कत्तलखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दहा कत्तलखान्यांना सील ठोकण्यात आले. या कारवाईमुळे कत्तलखाने चालकांचे धाबे दणाणले. बुरूडगाव कचरा डेपोत जनावरांचे टाकाऊ मांस जाणार नाही, याची काळजी मनपाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे बंद केले कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाहीत, यासाठी अधिकारी सतर्क आहेत.

प्रशासनाने बुरूडगाव कचरा डेपोतील टाकाऊ मांसाची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करत बेकायदा कत्तलखान्यांवरही कारवाई केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची कार्यवाहीदेखील सुुरू आहे. त्यामुळे बुरूडगाव कचरा डेपो परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लवादासमोर उद्या होणार सुनावणी
बुरूडगाव डेपाेत टाकण्यात आलेल्या मांसाची विल्हेवाट लावून बेकायदा कत्तलखाने दोन दिवसांत बंद करण्याचे आदेश हरित लवादाने मनपाला दिले होते. कार्यवाहीचा अहवाल १९ ला सुनावणीत सादर करण्याचे आदेश लवादाने दिले. विशेष म्हणजे या सुनावणीला आयुक्त दिलीप गावडे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...