आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध पाच खडीक्रशरमुळे 100 हेक्टर शेती धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - तालुक्यातील गोयकरवाडी व खरातवाडी परिसरातील अवैध खडीक्रशर व खाणीमुळे शेतकर्‍यांची शंभर हेक्टरवरील क्षेत्राला फटका बसत आहे. परिसरातील खडीक्रशर मशीन बंद करा; अन्यथा 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असा इशारा कांतीलाल महारनवर, भाऊसाहेब बानगर, कांतीलाल खरात, भगवान कोळेकर यांच्यासह 65 शेतकर्‍यांनी दिला आहे. या प्रकरणी राज्याचे लोकायुक्त पुरुषोत्तम गायकवाड यांच्याकडे तक्रार दिली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश फुलसे यांनी 22 फेब्रुवारी 2013 रोजी गोयकरवाडी व खरातवाडी परिसरातील पाच अवैध खडीक्रशर कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, असे असताना या भागात एक खडीक्रशरचालकाने खडीक्रशर उभारणीचे काम चालू ठेवले आहे. याप्रश्नी 14 मार्च रोजी आमदार प्रा. राम शिंदे यांनी उन्हाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गोयकरवाडी व खरातवाडी परिसरातील अवैध खडीक्रशर व खाणी कायमस्वरूपी बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे उत्तर विधानसभेत दिले होते. त्यानंतरही खडीक्रशर उभारणीचे काम चालू असल्याने याप्रश्नी शेतकर्‍यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जुलै रोजी येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार आहेत. शेतकर्‍यांनी याप्रश्नी प्रारंभी 11 ऑक्टोबर 2012 रोजी जामखेड येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2012 रोजी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. दरम्यान, 22 ऑक्टोबर 2012 रोजी शेतकर्‍यांनी आमदार प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी अवैध खडीक्रशर चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी संदीप कोकडे व तहसीलदार विजय कुलांगे यांना दिले. मात्र, या दोघाही अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी तहसीलदार व जवळा येथील कामगार तलाठय़ांनी खोटा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना दिला.

खडीक्रशरला वीजपुरवठा करण्यासाठी रोहित्र बसवण्याचे काम झाले. परंतु वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना 13 जून रोजी दिलेल्या लेखी पत्रात सर्व खडीक्रशरचा वीजपुरवठा देण्यात आला नाही, असे कळवले. गोयकरवाडी व खरातवाडी परिसरात पाच खडीक्रशर मशीन गावांपासून अवघ्या 500 मीटर अंतराच्या आत आहेत. खडीक्रशरच्या धुळीच्या थराने शेतीला धोका आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचे निवेदन राज्याचे पर्यावरण संचालक डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, महसूलमंत्री यांना दिले आहे.