आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर, जिल्ह्यात गावठी कट्टय़ांचा सुळसुळाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरासह जिल्ह्यात गावठी कट्टय़ांचा सुळसुळाट झाल्याचे तोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. गावठी कट्टय़ांबाबत यापूर्वीच्या पोलिस कारवाया केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरल्या असल्याचेही पुढे आले आहे. तोफखाना पोलिसांनी नऊ जणांना अटक करून त्यांच्याकडून सहा गावठी कट्टय़ांसह 20 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटकेतील आरोपींनी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. राजकारणे यांनी गुरुवारपर्यंत (6 फेब्रुवारी) पोलिस कोठडी सुनावली.

मोहन अण्णा वेठेकर (23, पांढरेवाडी, कोळगाव, ता. र्शीगोंदे), सोनू ऊर्फ आनंद प्रल्हाद गिते (22, झारेकर गल्ली, नालेगाव), अशोक बाबुराव कुसमुडे (35, पोस्ट ऑफिसशेजारी, वांबोरी, ता. राहुरी), कुलदीप रमेश पाटील (22, नेहरू मैदान चौक, वांबोरी, ता. राहुरी), विकास अप्पासाहेब लोटके (33, एसटी स्टँडजवळ, खंडाळा, ता. नगर), बापू बलभिम निंभोरे (29 घोटवी, ता. र्शीगोंदे), महेश शांताराम गुंड (21 वडगाव गुंड, देविभोयरे, ता. पारनेर), संतोष अशोक भाकरे (24, मुळा कॉलनी, वांबोरी, ता. राहुरी), राहुल अंकुश गुंड (21, वडगाव गुंड) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वेठेकर हा मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल आणून शहर व जिल्ह्यात विकत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. तो गिते याला काडतुसे विकण्यासाठी शहरात आल्याची माहिती मिळाल्यावरून तोफखाना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर आठ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच गावठी पिस्तुले, एक एअरगन व 20 जिवंत काडतुसे असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. इतर आरोपींनी वेठेकर याच्याकडून गावठी पिस्तूल व काडतुसे खरेदी केली आहेत. सोमवारी या आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. राजकारणे यांनी 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींच्या चौकशीतून गावठी कट्टय़ाचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक विजय पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वाळूतस्करी व तत्सम अवैध धंद्यासाठी गावठी कट्टे जवळ बाळगणार्‍यांची संख्या यापूर्वी लक्षणीय होती. मात्र, अलीकडे गावगुंडांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे सर्रास गावठी कट्टे आढळून येत आहेत. तात्पुरता तपास करून प्रकरण थंड्या बस्त्यात जात असल्याने ही शस्त्रे विकणार्‍या दलालांचे फावते आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शैलेंद्र जाधव, राजेंद्र वाघ, सुरेश डाके, राहुल राठोड, विष्णु भागवत, अभय कदम, राम माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाईत होतेय कुचराई
दोन वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने जवळपास 80 गावठी कट्टे जप्त करत गावठी कट्टे विकणार्‍या व वापरणार्‍यांवर जरब बसवली होती. त्यावेळी मध्यप्रदेशपर्यंत गेलेले पथक खाली हाताने परत आले होते. त्यानंतर नेवासे तालुक्यातील एका टोळीवर आठ महिन्यांपूर्वी कारवाई झाली. मात्र, अधिक खोलात जाऊन कारवाई करण्याचे पोलिसांनी टाळले. पोलिसांच्या याच मानसिकतेचा फायदा उठवत गावठी कट्टय़ांचा बाजार तेजीत आहे.

पोलिसांवर राजकीय दबाव
विकास लोटके याला अटक करताना तोफखाना पोलिस पथकालाच दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हस्तकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दबाव झुगारत पोलिसांनी लोटकेवर कारवाई केली. नालेगावातील आरोपीबाबत असाच प्रकार घडला.