आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गैरव्यवहाराचा आरोप करत संचालकांवर फेकली साडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत श्रीगोंदे येथील जागा खरेदीचा मुद्दा चांगलाच गाजला. काही कार्यकर्ते व्यासपीठाकडे धावले, त्यातच श्रीगोंद्याच्या एका सभासदाने गैरव्यवहाराचा आरोप करत संचालकांवर साडी पाची पोषाख भिरकावला. या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला. मात्र संचालक भाऊसाहेब कचरे यांच्या संयमी भूमिकेमुळे सभा पूर्ण झाली. जिल्हा माध्यमिक सोसायटीची २०१५-२०१६ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नंदनवन लॉन येथे झाली. यावेळी अध्यक्ष सूर्यकांत डावखर, भाऊसाहेब कचरे, अप्पा शिंदे, धनंजय म्हस्के, कल्पना जिवडे, बाबासाहेब बोडखे आदी उपस्थित होते. सभेत "सैराट जागा खरेदी' असे लिहिलेली टोपी विरोधी सभासदांनी परिधान केली होती. अहवाल वाचनापूर्वी सचिवांनी अहवालातील अनेक चुकांची दुरुस्ती सांगितली. यावर सभासदांनी संताप व्यक्त केला. आपण शिक्षण आहोत अशा चुका झाल्याच कशा असा सवालही उपस्थित झाला. अध्यक्ष डावखर म्हणाले, माध्यमिक शिक्षक सोसायटी सहकारात दर्जेदार काम करणारी संस्था आहे. पुढील काळात दहा लाखांचे कर्जवाटप करून त्यावर १० टक्के व्याज आकारण्याचे नियोजन आहे. संपूर्ण कारभारच ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे, असे सांगितले. त्यानंतर रामदास जंजिरे या श्रीगोंदे येथील संचालकाने सत्ताधाऱ्यांवर सुशिक्षित भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. या कारभारापोटी त्यांचा पोषाख देऊन सत्कार करण्यात येत असल्याचे जाहीर केले. जंजीरे संचाकांकडे गेल्यानंतर संचालकांसह काही सभासदांनी या प्रकाराला विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

त्यावेळी साडीसह इतर पोषाखच संचालक तसेच अध्यक्षांवर भिरकावण्यात आला. त्यावर कचरे म्हणाले, एका सभासदाने साडी फेकली म्हणजे अवमान होत नाही. सभा उधळण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. खालच्या थराला जाऊ नका, आम्हाला सभासदांनी निवडून दिले आहे, आम्ही पळून जाणार नाही, अशी ठाम संयमी भूमिका घेत सभा पुढे सुरू ठेवली. त्यानंतर जागा खरेदीचा विषय काही सभासदांनी मांडला. त्यात संस्थेला स्वत:ची जागा खरेदी करण्यापेक्षा भाडेतत्त्वावरील जागाच परवडेल हे आकडेवारीसह पटवून दिले. जागा खरेदीतून कसा तोटा होतो हा मुद्दा अधोरेखित केला. त्यापाठोपाठ रोजंदारीवर भरती केलेल्या पाच कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आला. त्या आदेशावर तारीख नसल्याने हे कर्मचारी भविष्यात न्यायालयात जातील, त्याना कायम करावे लागेल असेही स्पष्ट केले.

तुषार शिंदे यांनी घेतलेली जागा अडगळीच्या ठिकाणी आहे. ती १३ लाख या जास्तीच्या दराने खरेदी केल्याचा आरोप केला. हे १३ लाख कोणी खाल्ले याचा हिशेबही मागितला. विविध मुद्द्यांवरून रंगलेला सत्ताधारी तसेच विरोधकांचा कलगीतुरा सुरूच होता. सर्वच प्रश्नांना उत्तर देण्याची भूमिका कचरे यांनी घेतल्यानंतर तीन तासांहून अधिकवेळ ही सभा सुरूच होती.

फंड वापरणे योग्य
साडी फेकल्याने काही अवमान होत नाही. जागा खरेदीसाठी ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार प्रक्रिया ठरवून दिली आहे. रिझर्व्ह फंडला धक्का लावायचा नाही, पण जिल्हा बँक आपल्याला टक्के व्याज देते. उर्वरित फंडावर आपल्याला दहा टक्के व्याज मिळते. त्यामुळे संस्थेची जागा हाही रिझर्व्ह फंडच आहे. त्यामुळे हा फंड वापरणे योग्य आहे. जागा खरेदी शासनदरापेक्षाही कमी दराने केली. भाऊसाहेब कचरे,संचालक, माध्यमिक सोसायटी
बातम्या आणखी आहेत...