आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा जप्ती प्रकरणाचा पोलिस तपास संथगतीने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - नगर - मनमाड रस्त्यावरील राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात रविवारी दुपारी 12 वाजता अपघातानंतर वाहनात 14 लाख रुपयांचा गुटखा आढळून आला होता. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी तपासाची चक्रे राज्य पातळीवर फिरवणे आवश्यक होते. परंतु, याप्रकरणी तपास संथ गतीने सुरू असून अद्यापही मुख्य आरोपी मोकाट आहे.

गुहा शिवारातील माउली दूध केंद्रासमोर मॅक्स (एमएच 23 वाय 1308) हा पीकअप कोल्हारकडे जात असताना रस्त्यावर थांबला होता. त्यावेळी नगरहून शिर्डीकडे वेगाने जात असलेला आयशर (जीजे 6 झेड 3227) टेम्पोने पीकअपला जोराची धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी केली. यावेळी आयशर टेम्पोमध्ये 14 लाख रुपये किमतीचा 18 टन गुटखा सापडला. त्यानंतर हा गुटखा कुठून कोठे नेला जात होता यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले नाही. उलट आरोपी सुटतील अशी, संशयास्पद भूमिका घेतली. सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास आयशर टेम्पोचा चालक पांडुरंग काशिद (सांगोला, सोलापूर) यास न्यायालयात हजर केले असता त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वास्तविक पोलिस कोठडी मिळाली असती, तर गुटखाविक्रीचे जाळे उघडकीस आले असते. परंतु, तसे होऊ नये म्हणून पध्दतशीर योजना राबवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना सुमारे लाखो रुपयांचा गुटखा आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यात गुटखा, तंबाखू, विडी, सिगारेट आदींचे ठोक विक्रेते व्यापारी आहेत. काही ठिकाणी छुप्या पध्दतीने गुटख्याची विक्री होते. लाखो रुपयांचा हा गुटखा शहरातील ठोक विक्रेत्यांकडे आणण्यात आला असण्याची शक्यता आहे. असे असतानाही पोलिसांनी तपासाची संधी हेतूत: गमावली. यात अर्थपूर्ण संबंध झाले असावे. आरोपीला पोलिस कोठडी दिली असती, तर जामीन मिळण्यास अडथळा आला असता. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न झाला. राहुरीत सर्रास गुटखा विक्री असताना अद्यापही एकाही दुकानावर छापा टाकण्यात आलेला नाही. एकूणच सापडलेल्या गुटखा प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे होते.

रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
अपघातात सापडलेला गुटखा महाराष्ट्रात विक्रीसाठी येत होता का? याविषयी पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणातून महाराष्ट्रातील गुटखाविक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.’’
अशोक रजपूत, पोलिस निरीक्षक.

वरिष्ठ पातळीवर तपास आवश्यक
गुहा येथील अपघातात सापडलेल्या गुटख्याचा तपास वेगाने होऊन या प्रकरणाचा तपास वरिष्ठांकडून होणे आवश्यक होते. असे झाले तर कदाचित सत्य बाहेर आले असते.’’
रमेश सुराणा, किराणा व्यापारी.