आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड एकरावर साकारले ‘आयएमए भवन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नगर शाखेतर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा ‘आयएमए भवन’ या भव्य वास्तूचे उद्घाटन रविवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोमाणी आणि बांधकाम समितीचे सचिव डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, ‘आयएमए’चे राज्य सचिव डॉ. जयेश लेले, ‘इमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटुरकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. सोमाणी म्हणाले, संघटनेची स्वमालकीची वास्तू असावी, असे ‘आयएमए’चे स्वप्न होते. वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना डॉक्टरांना नेहमी वैद्यकीय ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत राहावे लागते. नवी संशोधने होतात. त्याची माहिती मिळवण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, संमेलने याद्वारे माहितीचे आदान-प्रदान होत असते. अशी व्याख्याने आयोजित करणे हा ‘आयएमए’च्या कामाचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठीच संघटनेला अशा एखाद्या वास्तूची आवश्यकता होती. सन 2002 मध्ये डॉ. श्रीधर काटे यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर सर्व सदस्यांनी मिळून कल्याण महामार्गावर एक प्लॉट खरेदी केला. 14 फेब्रुवारी 2010 रोजी वास्तूच्या कामाचे भूूमिपूजन झाले. अनेक अडचणींतून मार्ग काढत अखेर साडेतीन वर्षांनंतर भवनाची ही वास्तू प्रत्यक्षात साकार करण्यात ‘आयएमए’ला यश मिळाल्याचे डॉ. सोमाणी यांनी सांगितले.

या उद्घाटन समारंभासाठी नगरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. सुभाष तुंवर, डॉ. धनंजय वाघ, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. निसार शेख व ‘आयएमए’च्या सर्व सभासदांनी केले आहे.

अत्याधुनिक वास्तू
ही वास्तू दीड एकर जागेवर 12000 चौरस फूट क्षेत्रफळाची आहे. त्यात 320 आसन क्षमतेचे वातानुकूलित सभागृह आहे. या सभागृहात ऑडिओ व्हिज्युअल सुविधा उपलब्ध आहे. हॉलमध्ये अत्याधुनिक ध्वनियंत्रणा व वातानुकूलित यंत्रणा आहे. त्याशिवाय डॉक्टरांची व्याख्याने, परिषदा, सेमिनार यासाठी पन्नास आसन क्षमतेचा स्वतंत्र सेमिनार हॉल येथे आहे. त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची अत्याधुनिक सुविधा असून त्याद्वारे बाहेरगावहूनही तज्ज्ञांची व्याख्याने होऊ शकतील. हा हॉल शहरातील इतर संस्थांच्या चांगल्या कार्यक्रमांसाठीही देण्याचा मानस डॉ. कांडेकर यांनी व्यक्त केला. सभासदांसाठी ई - लायब्ररीही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाहेरून आलेल्या सदस्यांसाठी सात शयनकक्ष येथे उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर बाहेरच्या बाजूस अँम्फिथिएटर, कँटीन, जॉगिंग ट्रॅक, जिम्नॅशियम अशा काही सुविधांनी ही वास्तू परिपूर्ण करण्याचा प्रयत्न पुढील काळात ‘आयएमए’ करणार असल्याचे डॉ. कांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.