नगर- तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात बराच बदल झाला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे व आवडीनुसार शिक्षणाची निवड करता येते. टक्केवारी लक्षात घेता विद्यार्थी एक ते दीड टक्काच ज्ञान प्राप्त करतात. हे प्रमाण तुटपुंजे असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयएमएचचे संचालक डॉ. शिवशंकर मिश्रा यांनी केले.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे फाउंडेशनच्या आय. बी. एम. आर. डी. संस्थेत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात "ग्रामीण शैक्षणिक विकासासाठी आयसीटीची भूमिका' या विषयावरील चर्चेत ते बोलत होते. आयबीएमआरडीचे संचालक डॉ. अरुण इंगळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री मोरे यांनी केले.
तिस-या दिवशी चौथ्या सत्रात डॉ. बी. आर. आदिक, डॉ. जी. एच. बारहाते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन अपर्णा निसाळ यांनी केले. पाचव्या सत्रात डॉ. संजय धर्माधिकारी, डॉ. बी. के. सलालकर हे परीक्षक होते. याचे सूत्रसंचालन रिद्धी पांचाळ यांनी केले. फाउंडेशनचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, बाळासाहेब विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे यांनी या परिषदेला शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी जनरल डॉ. बी. सदानंदा, टेक्निकल
डायरेक्टर डॉ. पी. एम. गायकवाड, डेप्युटी डायरेक्टर डॉ. अभिजित दिवटे यांचे पाठबळ परिषदेला लाभले. या परिषदेचा लाभ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व नगरमधील संशोधकांनी घेतला. परिषदेचे उदघाटन
मायक्रोसॉफ्टचे संचालक ललित मिश्रा यांच्या हस्ते झाले. आयसीटीचा ग्रामीण विकासासाठी कसा उपयोग करता येईल, यावर परिषदेत विचारमंथन झाले. उपयोगिता व वास्तविकता यावर सखोल चर्चा झाली. ललित मिश्रा यांनी या क्षेत्राची व्याप्ती व गरज व्यक्त केली. परिषदेत 163 शोधनिबंध सादर करण्यात आले. त्यापैकी काही आयबीएमआरडीच्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध केले
जाणार आहेत.
परदेशी विद्यार्थ्यांचा परिषदेत सहभाग
या परिषदेत 7 देशांतील 30 परदेशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. समारोपाला अखिल भारतीय तंत्र परिषदेचे रिजनल मॅनेजर डॉ. मंगेश घुगे उपस्थित होते. पुढील काळात आखाती देशांतील विद्यापीठासमवेत सामंजस्य करार, विद्यार्थी व शिक्षक देवाण-घेवाण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हमीद महेमूद समशान अहमद यांनी सांगितले.