आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेच असतानाही जायकवाडी धरणात जाणार नगरचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला असला तरीही निकालातून पाणी सोडण्याचा पेच आणखी वाढला होता. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडावे, असे आदेशात नमूद केल्याने सुरुवातीला जायकवाडीतून पिण्यासाठी लागणारे पाणी निश्चित करण्याची मागणी जिल्ह्यातून प्राधिकरणकडे करण्यात आली. मात्र, दांडगाई करत रविवारी रात्रीच जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. धरणसाठे अखत्यारित असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवून पाणी पळवण्याचा उद्देश सफल करण्याच्या हालचाली रविवारी रात्री वाढल्या होत्या.

उच्च न्यायालयाने जायवाडीला पाणी देण्यास विराेध करणाऱ्या याचिकांवर ३० ऑक्टोबरला निकाल देताना केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यास अनुमती दिली आहे. जायकवाडीतील सध्याचा पाणीसाठा गृहीत धरून जुलै २०१६ पर्यंतची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेत पुढील नियोजन अपेक्षित होते. न्यायालयाच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी साखर कारखान्यांनी प्राधिकरणकडे मागणी करून जायकवाडीच्या पिण्याच्या पाण्याची गरज निश्चित करूनच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली. सलग दुष्काळ खरीपाच्या आवर्तनापासून वंचित लाभक्षेत्राला उपलब्ध धरणसाठ्यातून थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता यातून जिवंत राहणार होती.

दुसरीकडे पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. पुरेसा पोलिस बंदोबस्त महावितरणकडून भारनियमनाची तयारी पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेसह वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची प्रतिक्षा जलसंपदा विभागातील अधिकारी करत असल्याचे चित्र होते. मात्र, नगर जिल्ह्यातील धरणांमधून रविवारी रात्रीच पाणी सोडण्याच्या हालचालींना सायंकाळी वेग आला होता. वरिष्ठ स्तरावरून केवळ तयारी करून ठेवण्याच्या सूचना येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यातून दांडगाई करूनच पाणी पळवण्याचा हा प्रयत्न असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...