आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Election There Should Be Teach Lesson, Gopinath Munde Say To Ajit Pawar

निवडणुकीत सत्तेची मस्ती उतरवणार, मुंडेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - माझ्या जिल्ह्यात व घरात येऊन मला गाडण्याची भाषा करणार्‍यांना सत्तेची मस्ती चढली आहे. आगामी निवडणुकीत ती मस्ती उतरवू, अशा शब्दांत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी नामोल्लेख टाळून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

पाथर्डी तालुक्यातील र्शीक्षेत्र भगवानगडावर रविवारी आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार पंकजा मुंडे-पालवे, शिवाजी कर्डिले, राम शिंदे, गडाचे महंत नामदेव शास्त्री, भाजप जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, विश्वस्त गोविंद घोळवे उपस्थित होते. दरवर्षीपेक्षा या वेळी भगवानगडावर मोठी गर्दी झाली होती.

मुंडे म्हणाले, राज्यातील साखर कारखानदारी आमच्या जिवावर उभी असल्याने राज्याच्या प्रगतीत खरा वाटा हा बारामतीचा नसून आमचा आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मी अर्ज भरल्यानंतर समोरासमोर लढण्याऐवजी रडीचा डाव खेळून त्यांनी तो अर्ज बाद ठरवला. क्रिकेट ही त्यांची मक्तेदारी नाही. ‘जिनके घर काच के होते हैं, वो दूसरों पर पत्थर फेंका नहीं करते’ हे त्यांनी ध्यानात घ्यावे. बीड जिल्हा बँक घोटाळा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला अन् पोलिस केस माझ्यावर करण्याची भाषा ते करत होते. मात्र, तसे करण्याची त्यांची हिंमत नाही. या बँकेचे कर्ज आपण भरून टाकले आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे शंभर कोटी रुपयांची थकबाकी आहे. दसर्‍यालासुद्धा ते फरार आहेत. जे पेराल तेच उगवते. या नेत्यांनी आता बारामतीकडून पैसे आणून भरावेत. माझ्याविरोधात पहिलवान उभा करू म्हणतात, पण एकही उमेदवार त्यांना सापडत नाही. चार दिवसांचे हे सरकार आहे. पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले असून आपणही केंद्रात मंत्री म्हणून राहणार आहोत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींना भगवानगडावर आणणार आहे. राज्यात माझा प्रभाव वाढल्याने यांच्या पोटात दुखत आहे. पंकजाचा मला अभिमान वाटतो. माझ्यावर झालेले वार ती झेलते. बाजारबुणग्यांना आपण किंमत देत नाही. राज्यकर्ते होण्याचा मक्ता फक्त त्यांचा नाही. कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. सर्वांनी परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हावे. भगवानगड पायथ्याचा पाच किलोमीटरचा रस्ता आठ दिवसांत करावा; अन्यथा आपण स्वत: कुदळ हातात घेऊ, असा इशारा मुंडे यांनी दिला.