आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा: संगमनेरात महिलाच आेढतात हनुमानाचा विजय रथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर येथे हनुमान जयंतीनिमित्त हनुमान विजयरथ आेढताना रणरागिनी. छाया: प्रसाद सुतार
संगमनेर - संगमनेरकरांचा सांस्कृतिक ठेवा ठरलेल्या हनुमान जयंती उत्सवातील हनुमान विजयरथाची मिरवणूक शनिवारी उत्साहात पार पडली. ब्रिटिशकाळात (सन १९२९) बंदी आदेश मोडत महिलांनी ही मिरवणूक काढली होती. परंपरेप्रमाणे याहीवर्षी महिलांनीच रथ मिरवणूक मार्गापर्यंत आणल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.

हनुमान जयंतीला रथाची मिरवणूक काढण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. मात्र १७ एप्रिल १९२७ यादिवशी प्रथम या परंपरेला ब्रिटिशांमुळे गालबोट लागले. त्यांनी सलग तीन वर्षे मिरवणूक काढण्यावर बंदी घातली. संगमनेरच्या रणरागिनींनी पुरुषांना मागे सारत हा बंदी आदेश मोडला आणि विजयरथाची मिरवणूक काढली. त्यामुळे ब्रिटिश नमले. रथ मिरवणुकीची सुरुवात करण्याचा महिलांना मिळालेला मान आजपर्यंत कायम आहे.

१९२७ मध्ये रंगारगल्लीतील सोमेश्वर मंदिरापर्यंत आलेली मिरवणूक ब्रिटिशांनी अडवली. ती भडंगबाबा मशिदीपासून नेता दुसऱ्या मार्गाने नेण्याचे सुचवले. त्यामुळे वाद निर्माण झाल्याने मिरवणूक तेथेच थांबली. २२ एप्रिलला मिरवणूक पुन्हा काढण्यात आली. त्यानंतरच्या वर्षी (५ एप्रिल १९२८) पुन्हा ब्रिटिशांनी सोमेश्वर मंदिरापाशीच रथ अडवत हरकत घेतली. यावेळी तब्बल दोन महिने हा रथ तेथेच होता. अखेरीस पुन्हा ब्रिटिशांनी मशिदीसमोरून रथ नेण्यास परवानगी दिली. त्यानंतरच्या कालखंडात बालम परदेशी, कुंदन परदेशी यांनी अव्याहत सुरू ठेवलेली ही परंपरा चंद्रशेखर चौकातील तरुण पुढे नेत आहेत.

पोलिस चढवतात भगवा ध्वज
१९२९पासून रथाच्या मिरवणुकीची सुरुवात महिला करत असल्या, तरी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यावेळेपासून आपल्या सहकाऱ्यांसह खांद्यावर भगवा ध्वज घेऊन मिरवणुकीने शहरातून वाजत- गाजत चंद्रशेखर चौकात मिरवणुकीच्या ठिकाणी येतात. आपल्या हाताने हा ध्वज रथावर चढवला जातो आणि त्यानंतरच रथ तेथून पुढे मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतो. यावर्षी हा ध्वज चढवण्याचा मान प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांना मिळाला होता.