आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये वाढतेय दारू विरोधात धार, टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक द्यावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अलीकडील काळात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमुख कारण दारूचे व्यसन हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे व्यसन सुखी संसारालाच नव्हे, तर आरोग्य सामाजिक शांततेला बाध्य ठरत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा दारुबंदी कृती समिती जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ मोठ्या जोमाने चालवत आहे. ही समिती दारूच्या आहारी गेलेल्या लोकांची मानसिकता बदलवण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील १३६५ गावापैकी ६७७ गावांनी म्हणजे अर्ध्या जिल्ह्याने दारूबंदीचा ठराव मंजूर करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. या चळवळीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.

जिल्ह्यातील सधन भागात दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. दारूची अधिकृत दुकाने तर वाढतच आहेत. त्याच प्रमाणे परमिट रूमची संख्याही वेगाने वाढत आहे. या शिवाय शहरांभोवती असलेल्या ढाबे हॉटेलांत अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. दारूच्या उपलब्धतेमुळे तरुण वर्ग तिच्या आहारी जात आहे. सायंकाळी हॉटेल ढाब्यांमध्ये हाच वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरी भागातील उच्चभ्रू वर्गातील महिलांमध्येही मद्यपान वाढत आहे.

दारूला मिळणाऱ्या या प्रतिष्ठेच्या विरोधात अहमदनगर जिल्हा दारुबंदी समितीची स्थापना बाबा सोनवणे यांनी केली. सुरुवातीला त्यांच्या या चळवळीची उपेक्षा झाली. मात्र, ग्रामीण महिला वर्गाचे या चळवळीला मोठे समर्थन मिळत गेले. आता त्यांच्या या मोहिमेशी २१००० लोक जोडले गेले आहेत. फक्त कायद्याने दारूबंदी लादून उपयोग नाही, तर हे व्यसन किती वाईट आहे, याबाबत प्रभावीपणे प्रबोधन करण्याची गरज ओळखून सोनवणे त्यांचे सहकारी काम करत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात एकाने आपल्या सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार केला. त्यावेळी या घटनेची सोनवणे यांनी सखोल माहिती घेतली असता संबंधित आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. दारूमुळे त्याने धक्का बसून त्यांनी आपल्या चळवळीचा श्रीगणेशा केला. गेल्या आठवड्यात नगर तालुक्यात खांडके ह्या गावात दारूच्या आहारी गेलेल्या माणसाने पत्नीवर अॅसिडने हल्ला केल्याचे उदाहरण समोर आले.

दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ होत असल्याचे सोनवणे यांचे निरीक्षण आहे. आयुष्य उद‌्ध्वस्त करणाऱ्या या व्यसनातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी, तसेच नवयुवा वर्ग या व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी ही चळवळ काम करत आहे.

राज्यभर दारूबंदीची गरज
महाराष्ट्रातवर्षाला ४० हजार कोटी रुपयांची दारू प्यायली जाते. यात गावठी, हातभट्टी आणि इतर स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या दारूचा समावेश नाही. त्यावर तर कोणाचेच नियंत्रण नाही. केवळ दारूतून मिळणाऱ्या महसुलापोटी राज्यभर दारूबंदी केली जात नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ द्याचे नसेल, तर फक्त वर्धा चंद्रपूर सारख्या दोन जिल्ह्यातं दारूबंदी करून चालणार नाही, तर राज्यभर ती असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर बाहेच्या राज्यांतून येणाऱ्या दारूवरही कडक नजर ठेवण्याची गरज सोनवणे यांनी व्यक्त केली.

ठरावावर कार्यवाही नाही
सोनवणेयांच्या चळवळीला ग्रामीण भागात मोठे यश मिळत आहे. सर्वच सरकारी यंत्रणांनी साथ दिली तर तरुणाईला दारूच्या विळख्यातून वाचवणे शक्य असल्याचे त्यांचे मत आहे. जिल्ह्यातील ६७७ गावांनी दारूबंदीचा ठराव करून तो गेल्या पाच जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. मात्र, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. जिल्हा प्रशासनाची अशी मानसिकता दारूसारख्या घातक व्यसनाला पोषक परिस्थिती निर्माण करत असल्याचे सोनवणे यांचे मत आहे. पण, संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीचा जोर वाढत आहे. हे या चळवळीचे यश आहे.

^दारूच्या व्यसनांमुळे कौटंबिक हिंंसाचार हा संवेदनशील विषय आहे. तसेच अधिकृत बरोबरच चोरटी दारू निर्मिती विक्री ही मोठी समस्या आहे. वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात अशा बाबींना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यासाठीही असा क्रमांक उपलब्ध केल्यास अशा घटनांवर नियंत्रण येऊन जनता प्रशासनाला धन्यवाद देईल.'' बाबासोनवणे, अहमदनगरजिल्हा दारूबंदी कृती समिती.