आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In The Name Of Religion Party Spread Irreligion Dr. Hamid Dabholkar

धर्माच्या नावावर अधर्म पसरवणारे पक्ष सत्तेत, डॉ. हमीद दाभोलकर यांचे टिकास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती सोहळ्यात पुरस्कारर्थींना पुरस्काराचे आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
संगमनेर - कोणत्याही व्यक्तीच्या कर्तव्याची फुटपट्टी ही त्याच्या पश्चात त्याने उभे केलेले काम किती सकसपणे चालते यावर अवलंबून असते. स्व. भाऊसाहेब थोरात आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोन्ही व्यक्ती याला उतरल्यात. धर्माच्या नावावर अधर्म पसरवणारे पक्ष सत्तेत आहेत. समाजात धर्मनिरपेक्षता रुजवणाऱ्यांनीदेखील तत्त्वापासून फारकत घेतल्याने सामान्य माणूस भरडला जात आहे, अशी टीका डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांना, डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार भारती विद्यापीठाचे कुलपती, माजी मंत्री पतंगराव कदम यांना, तर सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांना आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे, पंडित थोरात, दुर्गा तांबे, कांचन थोरात, शरयु देशमुख, रणजितसिंह देशमुख, अरुण कडू, माधवराव देशमुख, राजेश मालपाणी, प्रेमानंद रुपवते आदी व्यासपीठावर होते.

डॉ. दाभोलकर म्हणाले, देश सध्या एका अवघड कालखंडातून जात आहे. प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्यांचा सन्मान होण्याऐवजी त्यांना गोळ्या घालून मारले जात आहे. एकीकडे पुरस्काराचे समाधान असताना दुसरीकडे २९ महिन्यांनंतरही दाभोळकरांचे खुनी आणि सूत्रधार सापडत नाही. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचीही हत्या होऊन त्यांचेही मारेकरी सापडत नसताना या शक्तीची ताकद वाढत आहे. विरोधी विचार व्यक्त करणाऱ्यांना मॉर्निंग वॉकच्या नावाच्या नावाखाली धमकावले जात आहे. ज्या भाऊसाहेब थोरातांच्या नावाचा पुरस्कार आम्हाला दिला त्यांच्या नावाशी आमचे नाव जोडले जात आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. सहकारात त्यांनी आयुष्य खर्ची घातले. सहकार, व्यसनमुक्ती आणि अंधश्रध्दा निर्मुलनास थोरात यांनी आयुष्याची साधना मानली. पुढील काळात लोकांना बरोबर नेणारी, समाजाला उत्तरदायी असलेली सहकाळ चळवळ जोमदार करण्यासाठी त्याला वारकरी पंथाचीदेखील जोड मिळायला हवी. आमदार पवार म्हणाले, भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांच्या नावाने पुरस्काराने सन्मानित झालेली माणसेदेखील त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरही धर्माच्या नव्हे, तर अंधश्रध्देच्या विरोधात होते. प्रास्ताविक आमदार डॉ. तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ प्रकाश बर्डे यांनी, तर अाभार माधवराव कानवडे यांनी मानले.

राज्याने आदर्श घ्यावा
दिवंगत थोरात आणि शिंदे यांच्याशी जवळचा संबंध आला आहे. संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांनी विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करायचे असते. हा स्व. थोरातांचा आदर्श समोर ठेवत मी देखील सहकार हेच क्षेत्र निवडले. त्याच भावनेने माझे काम सुरू आहे. राज्याने आदर्श घ्यावा असे काम येथे उभे राहिले आहे. गुलाबराव शेळके, पुरस्कारार्थी.
पुरस्काराच्या रकमा दिल्या दुसऱ्या संस्थांना
शिंदेयांच्या नावाने दिलेल्या पुरस्काराची एक लाखाची रक्कम डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कामासाठी देत असल्याचे सांगितले, तर थोरात यांच्या नावाच्या पुरस्काराची एक लाखाची रक्कमदेखील पतंगराव कदम यांनी अंनिसला दिली. गुलाबराव शेळके यांनीदेखील पुरस्काराची रक्कम संस्थेला परत देणगीरुपाने देत असल्याचे सांगितले.
दोषींवर कारवाई करा
येथील सहकार हा सामान्य माणसाला शक्ती आणि आर्थिक ताकद देणारा आहे. या चळवळीकडे भाऊसाहेबांसारखे काही लोक ध्येयवादाने, तर काही लोक ही चळवळ मोडण्यासाठी आकर्षित झाले. सहकारातील दोषी, गडबडी करणाऱ्यांवर कारवाई करा, पण संस्था बंद मोडण्याचा उद्योग करू नका. पतंगराव कदम, पुरस्कारार्थी.