आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीन बीडीओंचा जिल्ह्यातील डिजिटल अंगणवाड्यांना फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या लोकसहभागातून डिजिटल करण्याचा विडा जिल्ह्याने उचलला आहे. ग्रामपंचायतींनी दहा टक्के निधीतून वीज नळकनेक्शन देण्याचे निर्देश आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनाही (बीडीओ) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळवले आहे. परंतु, गटविकास अधिकारीच उदासीन असल्याने ग्रामपंचायतींनीही डिजिटल अंगणवाडी उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

पूर्व प्राथमिक शिक्षण व्यवस्था ही शिक्षण व्यवस्थेची पहिली पायरी मानली जाते. पण या यंत्रणेकडे सरकारकडूनच दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीच जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन सर्वच शाळा संगणकीकृत केल्या. या उपक्रमाचे राज्यभरात कौतूक झाले. आता अंगणवाड्या डिजिटल करायच्या आहेत. यासाठी कोणताही विशेष निधी सरकारकडून उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लोकसहभागातूनच हा उपक्रम राबवायचा आहे. काही अंगणवाड्यांत टिव्ही, संगणक लोकसहभागातून खरेदी करून बसवण्यात आले. तसेच अंगणवाड्यांच्या भिंतींवरही विविध छायाचित्रे लावण्यात आली. त्यात निसर्ग चित्रे, प्राणी, खेळांचे प्रकार, अंक आदी विषयांची माहिती लावण्यात आली. जिल्ह्यात हजार ८०० अंगणवाड्या आहेत. आठ वर्षांपूर्वीच्या बहुतेक इमारतीत स्वच्छतागृहे नाहीत, नळ कनेक्शन, वीज कनेक्शनही नाही.

ग्रामपंचायतींनी महिला बालकल्याण साठीचा दहा टक्के निधी वापरून विजेचे नळाची पट्टी भरणे अपेक्षित आहे. तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून डिजिटल अंगणवाड्यांबाबत अंमलबजावणीचे आदेश दिले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी तशा सूचना ग्रामपंचायतींना देऊन वीज नळकनेक्शनसाठी आग्रह धरणे अपेक्षित होते. तसे झाल्याने डिजिटल अंगणवाडी उपक्रमाला संथ गतीने प्रतिसाद मिळत आहे.

खासगी इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक पूर्व शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांशी अंगणवाड्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. त्याबरोबरच कुपोषण निर्मुलनावरही भर द्यावा लागणार आहे. जबाबदाऱ्या वाढल्या असल्या, तरी अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. अत्यल्प मानधनातच अंगणवाडी सुरू आहे. आमदारांनीच शासन दरबारात अंगणवाड्यांच्या बळकटीकरणाचा मुद्दा लावून धरला, तरच अनेक प्रश्न सुटतील, असे जाणकारांचे मत आहे.

जिल्ह्यात हजार ८०० अंगणवाड्या आहेत, त्यापैकी हजार ४४१ अंगणवाड्या डिजिटल करण्यात यश आले आहे. डिजिटल अंगणवाडीतील भिंतींवर फुले, पाणी, खेळांचे प्रकार, अंक आदींची बोलकी छायाचित्रे लावण्यात आली आहेत. त्यापैकी काही ठिकाणी टिव्ही, संगणकही उपलब्ध झाले आहेत.
निधी अभावी अडचण
जिल्ह्यात अंगणवाड्यांची संख्या मोठी असताना वीज कनेक्शन असलेल्या अंगणवाड्यांची संख्या अवघी ५५३ आहे. त्याबरोबरच अवघ्या दीड हजार अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. उर्वरित तीन हजार अंगणवाड्यांत स्वच्छतागृहे नाहीत. सरकारकडूनही निधी उपलब्ध होत नसल्याने ही यंत्रणा अडचणीत आली आहे.
बीडीओंना पत्र देणार
ग्रामपंचायतींनी अंगणवाड्यांत नळ वीज कनेक्शन देणे अपेक्षित आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी चर्चा करून बीडीओंना पत्र देणार आहे. डिजिटल अंगणवाडी उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची सूचना देऊ. मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण.
बातम्या आणखी आहेत...