आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोजवारा नागरी समस्यांचा: महापौरांचा ‘स्वच्छता उपक्रम’ बारगळणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर संग्राम जगताप यांनी दुपारच्या सत्रात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला शहर स्वच्छतेचा उपक्रम अवघ्या आठवडाभरात बंद पडला. नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले, परंतु दुपारच्या सत्रात काम करण्यास कामगारांनी स्पष्ट नकार दिल्याने उपक्रम बारगळण्याची चिन्हे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी, महापौर, आयुक्त व संबंधित अधिकार्‍यांची सोमवारी (10 फेब्रुवारी) बैठक होणार आहे. बैठकीत तोडगा निघाला नाही, तर महापौर जगताप यांच्या शहर स्वच्छतेच्या पहिल्याच प्रयत्नात अपयश येईल.
शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले आहे. कचरा संकलन होत नसल्याने विविध भागांत कचर्‍यांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर जगताप यांनी पदभार स्वीकारताच शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले. त्यासाठी सकाळप्रमाणेच दुपारच्या सत्रातही स्वच्छतेचे काम सुरू ठेवण्याचा प्रायोगिक उपक्रम त्यांनी सुरू केला.
27 जानेवारीला उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. विविध भागांत दुपारच्या सत्रात स्वच्छतेचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले, परंतु अवघ्या आठवडाभरात झाडू कामगारांनी दुपारच्या सत्रात काम करण्यास नकार दिला. सकाळच्या सत्रात काम केल्यानंतर सर्व कामगार घरी जातात. या उपक्रमामुळे त्यांना दुपारी पुन्हा कामावर यावे लागते. अनेक कामगारांना रिक्षाने ये-जा करावी लागते. त्यामुळे आर्थिक झळ बसते. त्यामुळे सकाळच्या सत्रात दोन तास जास्त काम करू, पण दुपारी पुन्हा कामावर बोलवू नका, असा पवित्रा झाडू कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे महापौरांनी सुरू केलेला एक चांगला उपक्रम अवघ्या आठवडाभरात बंद पडला. कामगार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. महापौरांनी यासंदर्भात आता पुन्हा बैठक बोलावली आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
नगर शहरात स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर आहे. मनपा प्रशासन व अधिकार्‍यांनी या प्रश्‍नाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. महापौर जगताप यांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन चांगला उपक्रम सुरू केला, परंतु त्यास कामगार विरोध करत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होईल.’’ संजय तिवाटने, नागरिक
शहर स्वच्छ कसे होणार?
झाडू कामगार शहराची स्वच्छता करत असले, तरी महापालिका त्यांना या कामाचे पैसे देते. त्यामुळे दुपारच्या सत्रात काम करण्यास नकार देणे, ही कामगारांची भूमिका चुकीची आहे. आधीच शहरात कचर्‍याचा प्रश्न गंभीर आहे. त्यात कामगार असे वागले, तर शहर स्वच्छ कसे होणार? ’’ नितीन एकशिंगे, नागरिक.
योग्य तोडगा काढू
नागरिकांच्या सोयीसाठीच दुपारच्या सत्रात स्वच्छता करण्याचा प्रायोगिक उपक्रम हाती घेण्यात आला, परंतु कामगार त्यास विरोध करत आहेत. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हा चांगला उपक्रम आहे. त्यामुळेच नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले. कामगारांच्या समस्या व मागण्यांबाबत योग्य निर्णय घेऊन उपक्रम सुरू राहील, असा तोडगा काढू. ’’ संग्राम जगताप, महापौर
झाडू कामगार वेठबिगार
शहर झपाट्याने वाढत आहे, परंतु कामगारांची संख्या आहे तेवढीच आहे. त्यामुळे एका कामगाराला चार जणांचे काम करावे लागते. कामगारांची अवस्था वेठबिगारासारखी आहे. त्यात पुन्हा दुपारच्या सत्रात काम म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. काहीही झाले, तरी झाडू कामगार दुपारच्या सत्रात काम करणार नाहीत.’’ अनंत लोखंडे, अध्यक्ष, मनपा कामगार संघटना.
दुपारी स्वच्छता गरजेची
नगर शहरात दररोज सुमारे 120 टन कचरा जमा होतो. महापालिकेकडे केवळ 550 झाडू कामगार आहेत. त्यामुळे एकूण कचर्‍यापैकी फक्त 70 ते 80 टन कचर्‍याचे दररोज संकलन होते. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उर्वरित कचरा शहरात तसाच पडून राहतो. त्यामुळे दुपारच्या सत्रात स्वच्छता सुरू ठेवणे गरजेचे आहे.