आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपद्रवींवर ठेवणार "एनडी स्क्वॉड' नजर, "बालिकाश्रम'वरील अतिक्रमणे दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम गुरुवारी बालिकाश्रम रस्ता परिसराकडे वळवण्यात आली. या रस्त्यावरील पक्की अतिक्रमणे हटवण्यात आली. या मोहिमेमुळे नगरोत्थान योजनेतून सुरू असलेल्या बालिकाश्रम रस्त्याच्या कामातील अडसर दूर होण्यास मदत झाली.

अतिक्रमण विरोधी पथकाने भुतकरवाडी पंपिंग स्टेशनपासून जेसीबीच्या साहाय्याने पक्की अतिक्रमणे हटवण्यास गुरुवारी सुरुवात केली. पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली पंपिंग स्टेशन ते महालक्ष्मी उद्यानापर्यंतची अतिक्रमणे हटवण्यात आली. बंगल्यांच्या संरक्षक भिंती, सिमेंटचे ओटे, तसेच पायऱ्या पाडण्यात आल्या. नगरोत्थान योजनेतून गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून बालिकाश्रम रस्त्याचे काम सुरू आहे. २१ कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र, अतिक्रमणाच्या अडथळ्यामुळे या कामाला गती मिळत नव्हती. अतिक्रमणे हटवलेल्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काम सुरू होते. अतिक्रमण हटवण्यासाठी यापूर्वी गेलेल्या पथकांना विरोधाचा सामना करत माघार घ्यावी लागायची. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन उपायुक्त अजय चारठाणकर यांनी खंबीर भूमिका घेत बालिकाश्रम रस्त्यावरील पक्के अतिक्रमण हटवण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने पक्के बांधकाम जेसीबीने हटवण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे रखडत सुरू असलेल्या बालिकाश्रम रस्त्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.