आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याची स्फूर्ती देण्याचे अतुलनीय कार्य जिजाऊंनी केले अभिवादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : जुलमी,अत्याचारी, परकीय सत्ताधीशांच्या जोखडात शेकडो वर्षे खितपत पडलेल्या महाराष्ट्रासह मराठी मनाला स्वातंत्र्याची स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे अतुलनीय कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले, असे प्रतिपादन आर्किटेक्ट फिरोज शेख यांनी केले. 
 
जिजाऊ जयंतीनिमित्त मखदुम सोसायटी मराठा सेवा संघाच्या वतीने वस्तुसंग्रहालयातील राजमाता जिजाऊ शहाजीराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोपानराव मुळे, उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरफुद्दिन शेख, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजित वाघ, अॅड. शिवाजी कराळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, राजूभाई शेख, शफाकत सय्यद, बहिरनाथ वाकळे, अाबिद दुलेखान, आसिफ खान, दत्ता वडवणीकर, अादित्य वडवणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेख म्हणाले, रयतेच्या स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्य निर्मितीची संकल्पनाच जिजाऊंची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इतिहासाला कलाटणी देण्याचे कार्य शिवरायांकडून जिजाऊंनी करवून घेतले. राष्ट्रनिर्मितीच्या व्यापक भावनेने केलेले हे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. गुंजाळ म्हणाले, शिवछत्रपतींना घडवणाऱ्या आणि आयुष्यभर निरपेक्ष बुद्धीने कार्य करणाऱ्या जिजाऊ श्रीमानयोगिनी ठरल्या. राजाचे जनतेशी कल्याणकारी नाते असते. याउपर जिजाऊंचे जनतेच्या वेदनेशी नाते होते. आपल्या रयतेची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेणाऱ्या राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊच होत्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिद दुलेखान यांनी केले. प्रास्ताविक अभिजित वाघ यांनी केले, तर आभार शफाकत सय्यद यांनी मानले. याप्रसंगी मराठा सेवा संघ, मुस्कान सोशल फाउंडेशन, राजूभाई मित्र मंडळ, महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, रहेमत सुलतान फाउंडेशन, अहमदनगर सोशल क्लब आदी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.