नगर-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेचे पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांना देण्यात येणार्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत संघटनेच्या पदाधिकार्यांनी नुकतीच विभागीय सचिवांशी चर्चा केली.
संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील गाडगे यांनी दिलेली माहिती अशी, गेल्या अनेक वर्षांपासून शालांत परीक्षेचे पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांना 25 रुपये मानधन मिळते. एका दिवशी दोनदा पर्यवेक्षक म्हणून काम केले, तर 50 रुपये मानधन मिळते. केंद्र संचालकांना प्रतिदिन 85 रुपये व एका वेळच्या पेपरचे मानधन 40 रुपये आहे. उपकेंद्र संचालकांना 60 रुपये व अध्र्या दिवसाचे 35 रुपये मानधन मिळत असते.
जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर केंद्र संचालकांनी पर्यवेक्षण करणार्या शिक्षकाला यापेक्षा कमी मानधन दिले, तर तत्काळ विभागीय सचिव (पुणे मंडळ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी केले आहे, अशी माहितीही गाडगे यांनी दिली.
यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकार्यांनी विभागीय सचिव पवार यांच्याशी शिक्षकांच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. परीक्षा झाल्यानंतर चर्चा करून या प्रश्नांवर निर्णय घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले. राज्यात नऊ परीक्षा मंडळे आहेत. काही परीक्षा राज्य परीक्षा मंडळाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे त्यांच्याशीही चर्चा करावी लागेल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, सचिव मोहंमद सामी शेख, आर्शमशाळा प्रतिनिधी सुधीर शेडगे, अजय बारगळ, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, कार्याध्यक्ष शोभना गायकवाड, सचिव विभावरी रोकडे आदी उपस्थित होते.