आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा जिल्ह्यात वाढणार मतदानाची टक्केवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सर्वपक्षीय उमेदवार पहिल्यांदाच सर्व मतदारसंघांत रिंगणात असल्याने यंदा लढतीत चुरस असून मतदान घडवून आणण्यासाठी अधिक प्रयत्न होणार आहेत. परिणामी यंदा मतदानाचा टक्का चांगलाच वाढणार आहे.
विधानसभेचा बिगूल वाजल्यापासून जागावाटपाचे रंगलेले नाट्य युती व आघाडी तुटण्यात झाले. ऐनवेळी झालेल्या या महत्त्वाच्या घडामोडींमुळे सर्वच पक्षांना उमेदवार शोधण्याची कसरत करावी लागली. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या महत्त्वाच्या पक्षांनी कमी-अधिक प्रमाणात आयात व उपऱ्या उमेदवारांना संधी देऊन वेळ मारून नेली. गेली पंधरा दिवस प्रचारफेऱ्या, जाहीर सभा, आराेप-प्रत्यारोपाने प्रचारात रंगत आणली. उमेदवारांच्या मेहनतीला मतदार बुधवारी मतदारयंत्रातून प्रतिसाद देणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का चांगलाच वाढला होता. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लाेकसभेच्या निवडणुकीत नगर मतदारसंघात 62.63, तर शिर्डीत 63.97 टक्के मतदान झाले. 2009 च्या तुलनेत नगरमध्ये 11, तर शिर्डीत 14 टक्क्यांनी मतदान वाढले. मतदानाबाबत होत असलेली जनजागृतीही टक्केवारी वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. बाराही मतदारसंघांत शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या 48 उमेदवारांसह इतर पक्ष व अपक्ष असे 138 उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी रिंगणात असल्याने आपापल्या बाजूने मतदान घडवण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करत आहेत. हक्काचे मतदान व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांची खास फळी कामाला लावण्यात आली आहे. कोणताही धोका पत्करण्यास उमेदवार तयार नाहीत. लाेकसभेच्या वेळी आलेल्या मोदी लाटेच्या प्रभावातून वाढलेले मतदान विधानसभेतही जाणवणार असले, तरी हे मतदान भाजपकडेच जाईल, याची शाश्वती नाही. गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक मतदार शिर्डी मतदारसंघात वाढले आहेत, तर सर्वात कमी मतदार नगर शहरात नोंदले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीत सरासरी जवळपास 68 टक्के मतदान झाले होते. या टक्केवारीत पाच ते दहा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.