आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांची सुरक्षा वाऱ्यावर; गुन्हेगारीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहरातील महाविद्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगर महाविद्यालयात काही दिवसांपूर्वीच दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. त्यात काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. गुंडगिरी करणारे तरुण बिनदिक्कत महाविद्यालयाच्या परिसरात दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी आपल्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थी पालकांमधून होत आहे.
प्राध्यापकाच्या डोक्याला बंदूक लावून धमकी देण्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी पेमराज सारडा महाविद्यालयात घडला. काही दिवसांपूर्वी नगर महाविद्यालयात दोन गटांत हाणामारीचे प्रकरण घडले, तर महापुरुषाचा बिल्ला खिशाला लावल्याच्या रागातून न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या उपाहारगृहात दोन दिवसांपूर्वी एका युवकावर चॉपरने वार करण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयांमधील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
किरकोळ कारणातून एखादी मारहाणीची घटना घडली, तर महाविद्यालय प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. ठोस कारवाईसाठी कोणतेही महाविद्यालय पुढे येत नाही. अनेक महाविद्यालयांमध्ये राजकीय पक्ष संघटना वेळोवेळी हस्तक्षेप करतात. त्यातूनच अशा घटनांना खतपाणी मिळत आहे.
महाविद्यालयांमधील कायदा सुवस्थेचे तीन-तेरा वाजल्याने पालकांची काळजी वाढली आहे. विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार, तर नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे महविद्यालयांनी आपल्या सुरक्षेत वाढ करावी, छेडछाड तसेच हाणामारीचे प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी विद्यार्थी पालकांमधून पुढे येत आहे.

महाविद्यालयात गुंडगिरी, वाहनांची चोरी, छेडछाडीचे प्रमाण कमी होण्यासाठी िवद्यार्थी िवद्यार्थिनींकडून पोिलस संरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे.
बदनामी टाळण्यासाठी...
महाविद्यालयाच्या परिसरात छेडछाड हाणामारीच्या घटना वारंवार घडत असताना महाविद्यालय प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करते. बदनामी होऊ नये, यासाठी महाविद्यालयाचा आटापिटा सुरू असतो. हाणामारीची साधी तक्रारही पोलिसांकडे केली जात नाही. त्यामुळे पोलिसांचे हात बांधले जातात. त्यामुळे महाविद्यालय परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
अनुचित प्रकार घडत नाही
- महाविद्यालयात मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारातच सर्व विद्यार्थ्यांची ओळखपत्रे तपासली जातात. बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. दररोज साध्या वेशातील दोन पोलिस येऊन महाविद्यालयाची पाहणी करतात. शिस्तपालन समितीही दररोज आढावा घेते. त्यामुळे महाविद्यालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडत नाही.''
डॉ. अमरजा रेखी, प्राचार्य, सारडा महाविद्यालय.
सीसीटिव्ही कॅमेरे वाढवले
- महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीशी महाविद्यालयाचा कोणताही संबंध नव्हता. बाहेरील गुंड प्रवृत्तींच्या लोकांनी हा प्रकार घडवून आणला. त्याची योग्य ती दखल महाविद्यालयाने घेतली आहे. महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांचे निर्भया पथक दररोज गस्त घालते.''
अरुण बळीद, रजिस्टार, नगर. ,महाविद्यालय.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष
- महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही बसवले आहेत. परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती दिसल्या, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येते. विनाक्रमांक वाहनांची पाहणी करून सुरक्षा कर्मचारी त्याची नोंद करतात. आेळखपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत नाही. शिस्तपालन समिती महाविद्यालयाच्या आवारात दररोज पाहणी करते.'' डॉ. बी.एच. झावरे, प्राचार्य, न्यू आर्टस् महाविद्यालय.
बातम्या आणखी आहेत...