आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांची मध्यस्थी; तरी परस्परविरोधी तक्रारींत वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - रागाने पाहिले, कचरा घरासमोर टाकला, शेजाऱ्यांकडून होणारा त्रास, तरुणांमधील भांडण, मुलीकडे पाहिले, घरासमोर पाणी का सोडले?, उसनवारी यासारख्या अनेक तक्रारी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये सर्रास दाखल होतात. एकाने तक्रार दिली, तर त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा पुढे येतो. विशेष म्हणजे अनेकवेळा पोलिस स्वत: हे किरकोळ वाद आपसात मिटवण्यासाठी मध्यस्थी करतात. असे असतानाही परस्परविरोधी तक्रारींच्या प्रमाणात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

 

कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅप्म, नगर तालुका एमआयडीसी पोलिस ठाण्यांमध्ये अदखलपात्र (एनसी) तक्रारींच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यात परस्परविरोधी तक्रारींची संख्या अधिक आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एखाद्याची कोणतीच चूक नसतानाही त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली जाते. त्यात एखादा वजनदार व्यक्ती असेल, तर तो समोरच्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. शहरातील लहान-मोठे पुढारीही अशा प्रकरणात लक्ष घालतात. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्ती करूनही चूक नसलेल्या समोरच्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवली जाते. कामगार वसाहती, लहाना कॉलनी, सार्वजनिक ठिकाणे, महाविद्यालयांचा परिसर अशा ठिकाणी किरकोळ वादांचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकाने तक्रार दिली, तर दुसरा लगेच त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतो. अशावेळी पोलिस सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्नही करतात. परंतु ज्यावेळी वाद होतो, तेव्हा तेथे पोलिस उपस्थित नसतात. त्यामुळे किरकोळ शाब्दीक चकमक उडाली, तरी परस्परांच्या विरोधात हाणामारीचे खोटे गुन्हे दाखल झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तक्रार दिल्याने तुम्हाला होणारा मानसिक त्रास, वाया जाणारा वेळ पैसा अशा सर्व मार्गाने पोलिस तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तींचे प्रबोधन करतात. अशा वेळी परस्परविरोधी तक्रार देणारे आपसात वाद मिटवूनही घेतात. परंतु काही वेळा मात्र पोलिसांचाही नाइलाज होतो. त्यामुळे परस्परविरोधी तक्रारींची संख्या कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तर अशा तक्रारींचे प्रमाण थेट ५० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. इतर पोलिस ठाण्यांमध्ये देखील कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. 

 

परस्परविरोधी तक्रार देण्यात नगरसेवकही 
जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ केल्याप्रकरणी एका नगरसेवकाच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने संबंधित नगरसेवकाने देखील आपल्या ड्रायव्हरच्या माध्यमातून समोर व्यक्तीविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही परस्परविरोधी गुन्हा दाखल करावा लागला, असे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. कामगार, नोकरदार, मजूर तसेच राजकीय व्यक्ती देखील अशा तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. यासाठी अशा तक्रारी आपसात मिटवण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणीही सुजाण नागरीक करत आहेत. 

 

हाती काहीच लागत नाही 
दोन्ही गटांत हाणामारी होते. अनेकवेळा एका गटाकडून मारहाण होते. समाेरच्या व्यक्तीला गुंतवण्यासाठी मंगळसूत्र हिसकावले, मोबाइल, पैसे काढून घेतले म्हणून तक्रार दिली जाते. घातक शस्त्रांचाही उल्लेख होतो. जेणेकरून प्राणघातक हल्ला, जबरी चोरी, विनयभंग, शिवीगाळ, मारहाणीचे कलम लावले जातात. प्रत्यक्षात मात्र तसा प्रकार नसतो, काही घटना मात्र अपवाद असतात. अशा परस्परविरोधी खोट्या तक्रारी देण्यासाठी संपूर्ण दिवस पोलिस ठाण्यात जातो. वेळ पैसा खर्च होतो, हाती मात्र काहीच लागत नाही. 

 

काहीजण आमचे ऐकतात... 
किरकोळ कारणावरून वाद होतात, अशा वेळी संबंधित दहा- बारा लोकांना घेऊन तक्रार देण्यासाठी येतो. जे घडलेच नाही, ते सांगून तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला जातो. ज्याच्याविरोधात तक्रार आहे, तो देखील आपले लोक घेऊन तक्रार देण्यासाठी येतो. अशा वेळी आम्ही आमच्या परीने दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. काहीजण ऐकतात, परंतु अनेकवेळा आमचा नाइलाज होतो.’’ 
- विनोद चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी. 

 

समजूतदारपणा दाखवावा... 
किरकोळ वादातून तक्रार देण्यापेक्षा लोकांनीच समजूतदारपणा दाखवत आपले वाद आपसात मिटवले पाहिजे. अशा परस्परविरोधी तक्रारींमुळे पोलिसांवर कामाचा ताण तर वाढतोच, शिवाय संबंधितांचा वेळही वाया जातो. तक्रार दिल्याने त्यांनाच मानसिक त्रास होतो. सत्यता पडताळून परस्परविरोधी तक्रार दाखल होणार नाही, याचाही आम्ही प्रयत्न करतो.'' - अभय परमार, पोलिस निरीक्षक, कोतवाली 

बातम्या आणखी आहेत...