आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increasing The Confidence Of The People Believe Dr. Prakash Amte

लोकांचा विश्वासच आत्मविश्वास वाढवत- डॉ.प्रकाश आमटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-लोकांचा आपल्यावरील विश्वास हा आपला आत्मविश्वास वाढवण्यास कारणीभूत ठरतो. भाषेसारखी मोठी अडचण असतानाही आम्ही आदिवासींचा विश्वास प्राप्त केला. त्यामुळेच गेली 40 वर्षे त्यांच्यात आरोग्य व शिक्षणाचे काम करू शकलो, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
नेवासे तालुक्यातील सोनई येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे, ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर व शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना शुक्रवारी (24 जानेवारी) कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी डॉ. आमटे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख होते.
डॉ. आमटे यांनी आपल्या साध्या परंतु ओघवत्या शैलीतील भाषणात त्यांच्या कामाचा अवघा पटच उलगडून दाखवला. त्यांच्या कामातील अडचणी, त्यावर त्यांनी केलेली मात, सध्या त्यांच्या कामाचा कसा वटवृक्ष झाला, हे ऐकून उपस्थित भारावून गेले. डॉ. आमटे यांनी जंगलातील 40 वर्षांच्या संसार व कामामागे थोर समाजसेवक बाबा आमटे यांची प्रेरणा असल्याचे सुरुवातीसच नमूद केले. ते म्हणाले, ‘‘बाबांनी समाजातील लाखोंना चांगले काम करण्याची प्रेरणा दिली. माणसांना बरोबर घेऊन काम करण्याचे (वर्क वुईथ पीपल) बाबांचे तत्त्व होते. मोठे जमीनदार असतानाही त्यांनी तीव्र सामाजिक जाणिवेतून गरिबीचे व कष्टाचे आयुष्य स्वीकारले. साधेपणाच्या तत्त्वातूनच त्यांनी आम्हाला दोघा भावंडांना नगरपालिकेच्या शाळेत शिकवले. आम्हीही आमची मुले आदिवासींच्या शाळेत शिकवली. ती आता डॉक्टर झाली. सर्वांनीच बाबांच्या संस्कारांतून आलेला साधेपणा टिकवत सेवाव्रत स्वीकारले. आमटेंची तिसरी पिढी आता समाजसेवेत रमली आहे. याचे कारण उक्ती व कृती यात फरक न करण्याचा बाबांचा संस्कार सर्वांत खोलवर रुजला आहे.’’ डॉ. आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाच्या उभारणीचे अनुभव सांगताना माडिया जमातीच्या विलक्षण सहनशक्तीची उदाहरणेही सांगितली.
डॉ. काकोडकर यांनीही आपले कुटुंब गांधीवादी व वध्र्याच्या आर्शमात राहिलेले असल्याची माहिती सांगितली. आई-वडील गांधीवादी व स्वत: आयुष्यभर अणुशक्तीवर काम करणारे असा विरोधाभास नमूद करून ते म्हणाले की, खरे तर शक्तिशाली असणे व हिंसक असणे यात फरक आहे. अणूशक्ती म्हटले की, फक्त अणूबाँब समोर येतो, पण अणूशक्तीचे ऊर्जा, शेती व वैद्यकीय क्षेत्रात मोठे उपयोग आहेत. काही दशकांनंतर साधन संपत्तीचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे पर्यायी तरतूद करणे गरजेचे आहे. आपल्याला थोरियम आधारित व सौरऊर्जा असेच दोन विश्वसनीय पर्याय उपलब्ध आहेत. देशातील ऊज्रेची पूर्तता करण्यासाठी गरजेनुसार संशोधन करून परवडणारे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. त्यासाठी त्यांनी कर्करोगावरील उपचारांत लागणारे मशीन जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह परदेशातील मशीनच्या तुलनेत कसे निम्म्या किमतीत बनवले, याचे उदाहरण दिले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थित तरुणाईशी संवाद साधला. त्यांनी आधी इतिहासाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, इतिहास प्रेरणा देण्यासाठी असतो. शिवचरित्र समजण्यासाठी वर्तमानकाळ व वर्तमान समजण्यासाठी शिवचरित्र अभ्यासण्याची गरज आहे. अज्ञान व अनास्था हे आपले सर्वांत मोठे शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही वेगळ्या घटना त्यांनी सांगितल्या. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचे कार्य फक्त अफजलखानाचा वध किंवा शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याइतपत र्मयादित नाही. त्यांनी सामान्यांतून राष्ट्रीय चरित्र्याची निर्मिती केली. जिजामाता यांचा उल्लेख त्यांनी राजमाता न करता स्वराज्यमाता असा केला.
प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केले. त्यांनी यावेळी प्रतिष्ठानच्या सामाजिक कामांची माहिती दिली. त्यात त्यांनी प्रतिष्ठानने राबवलेल्या नेत्रदान चळवळीमुळे 300 लोकांना दृष्टी मिळाल्याचे नमूद केले. या शिवाय मोरे चिंचोर गावाच्या कायापालटाचीही माहिती दिली. डॉ. सुभाष देवढे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. यावेळी राजकीय नेते, प्राध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना तीन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विचार ऐकण्याची पर्वणी मिळाली. अतिशय नेटके संयोजन, ध्वनी व प्रकाश योजना, सर्वांना वक्ते दिसतील असा भव्य स्क्रीन यामुळे हा कार्यक्रम देखणा झाला.
डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अनिल काकोडकर यांना शुक्रवारी सोनई येथे कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
साध्या विवाहाचा वेगळा आदर्श
डॉ. आमटे यांनी आपल्या विवाहाची विलक्षण कहाणी उपस्थितांना सांगितली. त्यांचा विवाह झाला त्यावर्षी म्हणजे 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. लोक उपाशी असताना आपल्याकडील लग्नात जेवणावळी करणे, बाबा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाच भावणारे नव्हते. त्यामुळे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर अवघ्या 15 मिनिटांत कोणत्याही मंत्रोच्चराशिवाय हा विवाह आटोपला गेला. रूढार्थाने कोणताही मुहूर्त, संस्कार व कुळाचाराशिवाय झालेल्या लग्न व सहजीवनाला 42 वर्षे पूर्ण झाल्याचे डॉ. आमटे यांनी सांगताच उपस्थितांनी त्यांना जोरदार दाद दिली.
20 वर्षांनी कोळसा संपुष्टात येणार
देशातील योजना आयोगाने एकात्मिक ऊर्जा धोरण तयार केले आहे. त्यानुसार 2032 पर्यंतच्या ऊज्रेच्या गरजेचे अंदाज नोंदवण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या आपण आपल्या गरजेच्या एक तृतीअंश ऊर्जा आयात करतो. 2032 पर्यंत आपली ऊज्रेची गरज पाच पटींनी वाढेल. त्यावेळी आपल्याला लागणार्‍या ऊज्रेचा 60 टक्के हिस्सा आयात करावा लागेल. त्याचबरोबर ऊज्रेचा वापर पाच पटींनी वाढला, तर पुढील 20 वर्षांत देशातील कोळशाचे साठे संपुष्टात येतील, असे डॉ. काकोडकर यांनी नमूद करताना आपल्याला ऊज्रेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
लोकांचा विश्वासच आत्मविश्वास वाढवतो