आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीमुळे यंदा आंब्याची गोडी महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-यंदा सुरुवातीला हवामान अनुकूल असल्यामुळे आंब्याची झाडे मोहरली होती. परंतु मागील आठवडाभर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या वादळी पावसाने पिकांचे नुकसान केले. या गारपिटीचा फटका आंब्यालाही बसला आहे. जवळपास निम्म्याहून अधिक आंब्यांच्या झाडांचा मोहोर या गारपिटीमुळे गळून पडला. साहजिकच येत्या उन्हाळ्यात आमरस महागणार आहे.
यावर्षी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे पिकांचे व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने फळपिकांमध्ये द्राक्षे, डाळिंब, आंबा, केळी, अंजीर, भाजीपाला पिकांमध्ये कांदा, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस, इतर पिकांमध्ये गहू, हरभरा, करडई, ज्वारी, चारापिके, तर पशुधनामध्ये शेळ्या, मेंढय़ा, कोंबड्यांची जीवितहानी झाली. आणखी काही दिवस पावसाचे सावट राहण्याची शक्यता आहे. ओलावा टिकून राहणार असल्याने भाजीपाला व फळांवर बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील आंब्याला बसला आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात आंब्याचे उत्पादन घटणार आहे.
त्याचा परिणाम आंब्याच्या दरांवर होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आंब्याचे चांगले उत्पादन होते. पण यंदा गावरान आंबे कमी प्रमाणात उपलब्ध होतील. त्यामुळे आंबा चांगलाच भाव खाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा आमरसाच्या गोडीला मुकावे लागणार आहे. नगर शहरासह जिल्ह्यात रत्नागिरी, कोकणातूनही आंब्याची आवक होते. जिल्ह्यातील उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे बाहेरून येणार्‍या आंब्याचे दरही वाढण्याची शक्यता आहे.