आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील राजकीय संस्कृती गुन्हेगारांच्या जवळ जाणारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - साहित्यातून त्या-त्या काळातील समाज व्यक्त होत असतो. भारतातील राजकीय संस्कृती गुन्हेगारांच्या जवळ जाणारी आहे. अनेक गुन्हेगार आज संसदेत बसलेत. कालपरत्वे त्याचा परिणाम साहित्यावर झाला. त्यातून मानवी जीवन मूल्यांचा ऱ्हास होत अाहे, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.

येथील बोरावके महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अांतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य आणि इतर सामाजिक शास्त्रे या विषयावर डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश बिडवे होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, साहित्यावर त्या-त्या कालखंडातील समाज घटक परिणाम करत असतात. यात राजकारण, साहित्य संस्था, पुरस्कार, मूल्य कल्पना, रूढी, परंपरा, धर्म, संस्कृती, सामाजिक परिस्थिती, वाचकांची अभिरूची आणि विद्यापीठे यांच्या भूमिकांमधून साहित्य घडते. मूल्यात्मकता वाढते.

साहित्याच्या समाज शास्त्राचा आज जगभर केला जातो. मानवी मूल्यांचा संबंध येत असल्याने तत्त्वज्ञान हे साहित्यात अपरिहार्यतेने येत असल्याचे दिसून आले. त्यातूनच साहित्य ज्ञान विकसित होत असते. मुळातच साहित्य म्हणजे जगाचा शोध घेणारी ज्ञानमिमांसा आहे. शास्त्रांच्या सर्वच शाखा अशा प्रकारच्या ज्ञानाचा शोध घेत असतात. हा शोध घेणारे साहित्यिक वाचकाची अभिरूची बदलण्यात यशस्वी होतात.

धार्मिक साहित्य हे चमत्काराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आता ज्ञानाची वेगवेगळी क्षेत्रे निर्माण झाली. धर्मातील स्थिर कल्पनांना धक्का देत विज्ञान पुढे आले. विज्ञानवादामुळे साहित्यातील चमत्कार मनोरंजनास छेद मिळाला. आता भविष्यात धार्मिक चमत्कार असणारे साहित्य निर्माण होणे शक्य नसल्याचे मत डॉ. कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
चर्चासत्राचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य मीनाताई जगधने यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, डॉ. अशोक भोईटे आदी उपस्थित होते.

जगधने म्हणाल्या, साहित्य आणि इतर सामाजिक शास्त्रे या विषयावरचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र म्हणजे मायमराठीचा हा ‘हे विश्वची माझे घर’ चा शब्दोत्सव आहे. रयत शिक्षण संस्थेत मराठी विभागातर्फे होणारे हे चर्चासत्र आंतरराष्ट्रीय संशोधनाला चालना देणारे ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. भास्कर निफाडे यांनी, सूत्रसंचालन गणेश वाघ, सीमा चव्हाण यांनी, तर आभार प्रा. एकनाथ ढोणे यांनी मानले.
एकेरी होणारे संशोधन बंद व्हावे
भारतीयसाहित्य संशोधनाचा दर्जा पाहता जागतिक क्रमवारीत देश पहिल्या २०० च्या यादीतही नाही ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आता याबाबतीत आपल्याला पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या वाटेने जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एकेरी होणारे संशोधन आता बंद व्हावे. शिवाय ज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संवाद घडणे गरजेचे आहे, असे डॉ. बिडवे म्हणाले.
बोरावके महाविद्यालयात बोलताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले.