आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईच्या दिवसांतही जगभरात सर्वांत स्वस्त टपालसेवा भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - साधे पन्नास पैशांचे पोस्टकार्ड, पण ते थेट राष्ट्रपती भवनात तुमचे गार्‍हाणे पोहोचवू शकते. महागाई वेगाने वाढत असताना पोस्टकार्डाची किंमत मात्र अजून सामान्यांच्या आटोक्यात आहे. भारतातील टपालसेवा ही जगभरातील सर्वांत स्वस्त टपालसेवा आहे, अशी माहिती जामखेड येथील संग्राहक पोपटलाल हळपावत यांनी मंगळवारी दिली.

जागतिक टपालदिन बुधवारी जगभर साजरा होत आहे. त्यानिमित्त बोलताना हळपावत म्हणाले, सध्याच्या महागाईच्या दिवसांत केवळ पन्नास पैशांत देशात कोठेही पोस्टकार्ड पोहोचते. वास्तविक एका गावाहून दुसर्‍या ठिकाणी एक पोस्टकार्ड पाठवायला शासनाला 6 रुपये 64 पैसे खर्च येतो. तथापि, तोटा सहन करून ही सेवा शासन देते. जगातील ही सर्वांत स्वस्त टपालसेवा आहे.

जगातील पहिले पोस्टकार्ड 9 ऑक्टोबर 1869 रोजी ऑस्ट्रेलियात निघाले. पोस्टकार्डाची कल्पना व त्याचे डिझाइन एमानुल हरमैन या अर्थतज्ज्ञाची होती. त्या दिवसाची आठवण म्हणून ‘9 ऑक्टोबर’ हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो, असे हळपावत यांनी सांगितले.

भारतातील पहिले पोस्टकार्ड 2 जुलै 1879 रोजी जारी झाले. त्यावेळी त्याची किंमत पाव आणे होती. मजकूर लिहिण्यासाठी फक्त एका बाजूला कोरी जागा असे, तर दुसर्‍या बाजूची सगळी जागा पत्ता लिहिण्यासाठी असे. एका बाजूला कोपर्‍यात महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा होती. वरील बाजूस ईस्ट इंडिया कंपनीचे बोधचिन्ह असायचे. सन 1899 पासून ‘ईस्ट इंडिया कंपनी पोस्टकार्ड’ऐवजी ‘इंडिया पोस्टकार्ड’ असे छापले जाऊ लागले. 1935-36 पासून पाठीमागील अध्र्या भागावर मजकूर लिहिण्याची परवानगी देण्यात आली.

स्वातंत्र्यानंतरही दोन वर्षे सहाव्या जॉर्जची प्रतिमा
1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पहिली दोन वर्षे सहाव्या जॉर्जची प्रतिमा असलेले पोस्टकार्ड वापरण्यात येत होते. कारण त्यांचा मोठा साठा शिल्लक होता. 1949 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पोस्टकार्ड निघाले. त्यावर एलिफंटा येथील त्रिमूर्तीचे चित्र होते. त्याचे मूल्य होते आठ पैसे. तेव्हा सहा पैशांचा एक आणा आणि सोळा आण्यांचा एक रुपया होता. 1 एप्रिल 1956 पासून त्रिमूर्तीचे चित्र बंद झाले आणि शंभर पैशांचा रुपया झाल्यावर पाच पैसे किमतीचे पोस्टकार्ड जारी करण्यात आले. नंतर पोस्टकार्डाची किंमत सहा पैसे, दहा पैसे, पंधरा पैसे करत पन्नास पैसे झाली, असे हळपावत यांनी सांगितले.