आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत संचार निगमला यंदाचा इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे हिंदी भाषेतील उत्कृष्ट कामकाजासाठी येथील भारत संचार निगमला (बीएसएनएल) सन २०१३-१४ या वर्षीचा इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी (१५ नोव्हेंबर) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे.
नगरमध्ये राजभाषा कार्यान्वयन समिती १९९८ पासून कार्यान्वित आहे. केंद्र सरकारच्या राजभाषाविषयी आदेशांचे पालन करणे ही या समितीची जबाबदारी आहे. या समितीचे कामकाज राजभाषा अधिकारी विजय नगरकर हे सचिव म्हणून पाहतात. नगरकर या समितीतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम राबवतात. त्यांच्या या कार्याची दखल गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभाग सचिव नीता चौधरी यांनी घेतली.
हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार राज्यात नगर बीएसएनएलसह पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र व नागपूरच्या बँक ऑफ इंिडयाला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार बीएसएनएलचे महाव्यवस्थापक अजातशत्रू सोमाणी व राजभाषा अधिकारी नगरकर स्वीकारतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्य किरेन रिजीजू उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. देशभरात ४८ संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हिंदी भाषेच्या प्रसार व प्रचारासाठी १९८६-८७ पासून हा पुरस्कार मंत्रालय विभाग, सार्वजनिक क्षेत्र, भारत सरकार उपकृत बोर्ड, स्वायत्त संस्था, ट्रस्ट, राष्ट्रीयीकृत बँका, नगर राजभाषा कार्यान्वयन समिती यांना देण्यात येतो.
नगरकर यांना विशेष प्रशस्तिपत्र
देशभरातील १८ नगर राजभाषा कार्यान्वयन समित्यांच्या सचिवांना या पुरस्कार सोहळ्यादरम्यान विशेष प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. त्यात नगर बीएसएनएलचे विजय नगरकर यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभाग सचिव नीता चौधरी या गेल्या १६ सप्टेंबरला नगर दौऱ्यावर असताना त्यांनी नगरकर यांनी तयार केलेल्या डिजिटल शब्दकोषाची प्रशंसा केली होती.