आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाणी, फ्यूजन, अभिनयातून साकारणार ‘इंद्रधनू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गाणी, अभिनय व शिल्पकलेचे दर्शन घडवणारा ‘इंद्रधनू’ कार्यक्रम ‘अनुनाद’च्या वतीने येत्या रविवारी (24 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजता सावेडीतील राजमोती लॉन्स येथे होणार आहे. ‘बालगंधर्व’ फेम अभिनेता सुबोध भावे, गायक प्रथमेश लघाटे, गायिका योगिता पाठक हे या कार्यक्रमाचे आकर्षण असेल.

चित्रसृष्टीत आलेले अनुभव, किस्से व नाट्यप्रवेशासह सुबोध भावे रसिकांशी संवाद साधणार आहे. अचूक संवादफेक, संगीताची उत्तम जाण व अनेकविध भूमिकांमुळे अभिनयाला अनेक कंगोरे लाभलेल्या या हुरहुन्नरी अभिनेत्याला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळेल.

अतिशय लहान वयामध्ये आपल्या गायकीने मोठा पल्ला गाठलेला ‘लिटिल चॅम्प’ प्रथमेश लघाटे हा आपल्या गाण्यांनी ‘इंद्रधनू’मध्ये वेगळा रंग भरेल. अभंग, भक्तिगीते व नाट्यसंगीताबरोबर पॉप, रॉक संगीतावरही त्याचे प्रभुत्व आहे. प्रथमेशच्या जोडीला गायिका योगिता पाठक यांचा सुरेख स्वराविष्कार या कार्यक्रमात ऐकावयास मिळणार आहे. योगिता पाठक यांनी प्रसिद्ध संगीतकार अजय - अतुल यांच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

‘सारेगमप’च्या माध्यमातून नावाजलेले अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (कीबोर्ड), नीलेश परब (ढोलकी व तालवाद्य), आर्चिस लेले (तबला), दत्ता तावडे (ड्रम्स) हे कलावंत नगरमध्ये प्रथमच ‘फ्यूजन’ हा कलाप्रकार या वेळी सादर करणार आहेत. या सर्व कलावंतांशी संवाद साधणार आहेत पुण्यातील प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी. नगरचे प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे या वेळी रंगमंचावर प्रात्यक्षिकांसह शिल्प साकारणार आहेत. ‘अनुनाद’च्या या आधी झालेल्या मैफलीत कांबळे यांनी चित्रे काढली होती. या वेळी त्यांचा शिल्पाविष्कार अनुभवता येईल, असे तन्मय देवचके व कल्पेश अदावंत यांनी सांगितले.

‘अनुनाद’तर्फे यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॅक अँड व्हाइट’, ‘सोबतीचा करार’, तसेच गुरू-शिष्य परंपरेवर आधारित ‘परंपरा’ या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.