आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक क्षेत्रात इतरांचीही सुरक्षा सांभाळणे गरजेचे; शुक्लांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सध्याच्या अत्याधुनिक संगणकीय व जलद युगात औद्योगिक क्षेत्रात आपल्याबरोबर इतरांचीही सुरक्षा सांभाळणे अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन एल अँण्ड टी कंपनीचे सरव्यवस्थापक के. के. शुक्ला यांनी सोमवारी केले.

42 व्या जागतिक औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त कंपनीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला कंपनीच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुरक्षाविषयक झेंड्याचे अनावरण करून या सप्ताहाचा प्रारंभ शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे सहसरव्यवस्थापक अरविंद पारगांवकर, संदीप महाजन, तसेच कार्मिक व्यवस्थापक नागेशचंद्र आढाव व अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रघुनाथ कुताळ यांनी सुरक्षेविषयी सर्व उपस्थितांना शपथ दिली. शुक्ला म्हणाले, स्पर्धेच्या युगात व स्पर्धात्मक वातावरणामुळे स्वत:च्या पर्यायाने कुटुंबाच्या सुरक्षिततेविषयी सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. मात्र, सर्वांनी हे लक्षात ठेवावे की, सुरक्षितता सांभाळल्यास आपल्या कुटुंबाबरोबर आपणासही या सुंदर जगाचा आस्वादही घेता येईल.

मानव संसाधन विभागाचे प्रमुख नागेशचंद्र आढाव यांनी सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. अरविंद पारगावकर म्हणाले, सुरक्षितता ही प्रत्येकाने सहजासहजी न समजता सतत सांभाळण्याची बाब आहे. यात सातत्य असल्यास निश्चितच आपली सुरक्षितता वाढेल. त्यासाठी कंपनीतील सुरक्षा उपकरणे सर्वांनी वापरावीत. वाहने चालवताना हेल्मेट, सीट बेल्ट यांचाही प्राधान्याने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. वरिष्ठ अधिकारी संदीप महाजन यांनीही सुरक्षिततेविषयी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी ईश्वर हांडे, देवेंद्र अकोलकर, दत्तात्रेय बोर्डे, सुखदेव निमसे, रवी भावसार व कामगार सेनेचे प्रतिनिधी सुभाष दराडे, संदीप पाटील व अन्य कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.