आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डीचा न्‍याय: ‘त्या’ क्रूर कृत्याला शिक्षा तर केली, पण पूर्वीचा विश्वास निर्माण होईल?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपर्डी- अजूनही ती १३जुलैची काळरात्र आठवली की कोपर्डीकरांचा थरकाप उडतो. दीड वर्ष उलटून गेला. मात्र, अजूनही ती जखम कोपर्डीवासी विसरलेले नाहीत. 


कर्जत तालुक्यातील कोपर्डी आत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. अत्याचाराच्या घटनेनंतर कोपर्डीला पोलिस छावणीचे रूप आल होतेे. राज्यातील मंत्र्यांसह नेत्यांची आणि सामाजिक कार्यकर्त्यंाची रीघ लागली. येणाऱ्यांनी काही अाश्वासने दिली. त्यातील काही तात्काळ मार्गी लागली तर काही अजूनही प्रतीक्षेत आहेच. कोपर्डीच्या लेकींना आजही ५ वीच्या पुढील शिक्षणासाठी कुलधरणला जावे लागते आहे. आपली मुलगी शाळेतून सुरक्षित घरी येईपर्यंत पालक चिंतेत असतात. येणाऱ्या मंत्र्यांनी कुलधरण येथे स्वतंत्र पोलिस चौकी देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, अजूनही ते आश्वासन कागदावरच आहे.  पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानंतर पोलिस चौकी उभारली गेली. मात्र, ती कायम राहील याविषयी ग्रामस्थ साशंकच आहेत.  कोपर्डी घटनेनंतर टवाळखोरीला बऱ्याच अंशी चाप बसला. मात्र, काही ठिकाणी ते प्रकार सुरूच असल्याचे पालक आणि विद्यार्थिनी सांगतात.


या घटनेनंतर विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत विद्यालयात उपस्थित राहत होत्या. यासाठी शाळा प्रशासनानेही विद्यार्थिनीच्या रक्षणाकरिता  त्यांना कराटे प्रशिक्षणासह अडचणीप्रसंगी स्वत:च्या बचावासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मात्र आपल्या मैत्रिणीवर गुदरलेल्या प्रसंगाची आठवण येताच आजही त्या हिरमुसतात. शाळेत तक्रार पेटी ठेवण्यात आली असून शाळा प्रशासन ती रोज पाहते असे विद्यालयातील शिक्षक सांगतात. 


कोपर्डीसह पूर्ण तालुक्याला प्रतीक्षा होती ती त्या नराधमांना कडक शासन होण्याची. भविष्यात ग्रामीण भागात असे कृत्य करण्याची हिम्मत होऊ नये आणि भयमुक्त वातावरणात मुलींसह महिलावर्ग राहू शकावा, यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत होती. न्यायालयाने ती शिक्षा दिली आहे. त्यातून पीडितेला न्याय मिळाल्याची भावना तर आहेच, पण गुन्हेगार प्रवृत्तीला योग्य संदेश गेल्याचेही मानले जाते आहे.

 

खटल्याचा घटनाक्रम

> १३ जुलै २०१६ : कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करुन निर्घृण खून
> १४ जुलै २०१६ : मध्यरात्री गुन्हा दाखल, कर्जत बंद व रास्ता रोको. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंद्यात पकडले. पीडितेवर अंत्यसंस्कार.
> १५ जुलै २०१६ : कोपर्डी, श्रीगोंदा, जामखेडमध्येही बंद,आरोपी शिंदेला पोलिस कोठडी.
> १६ जुलै २०१६ : विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये सर्वपक्षीय रास्ता रोको, पालकमंत्री राम शिंदे यांची कोपर्डीला भेट, खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी, सहआरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना अटक
> १७ जुलै २०१६ : सहआरोपी भैलुमे व भवाळवर कोर्टात शिवप्रहारने अंडी फेकली. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे कोपर्डीत.
> १८ जुलै २०१६ : विधिमंडळ अधिवेशनात कोपर्डीवरुन खडाजंगी. कामकाज बंद. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन
> १९ जुलै २०१६ : विधानसभेत फाशीची मागणी
शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा तहसीलवर मोर्चा.
> २० जुलै २०१६ : महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर याही कोपर्डीत दाखल.
> २१ जुलै २०१६ : माजी खासदार प्रकाश आंबेडकरांना कोपर्डीत जाण्यापासून रोखले.
> २२ जुलै २०१६ : अण्णा हजारे, भय्यू महाराजांकडून कोपर्डीत पीडितेच्या कुटुंबीयांची भेट
> २३ जुलै २०१६ : विरोधामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दौरा अचानक रद्द.
> २४ जुलै २०१६ : कमालीची गुप्तता पाळत मुख्यमंत्र्यांचा कोपर्डी दौरा.
> २५ जुलै २०१६ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोपर्डीत भेट.
> ३१ जुलै २०१६ : शरद पवार व शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंची कोपर्डीत भेट.
> ९ ऑगस्ट २०१६ : सकल मराठा समाजाचा औरंगाबादेत पहिला मोर्चा.
> ७ ऑक्टोबर २०१६ : कोपर्डी हत्याकांडाबाबत घटनेच्या ८६ दिवसांनी जिल्हा सत्र न्यायालयात तिन्ही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल.
> २० डिसेंबर : खटल्याची सुनावणी सुरू.
> १ एप्रिल २०१६ : कोर्टाच्या आवारात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरोपींवर हल्ला.
> २४ मे २०१७ : सरकार पक्षाचे साक्षीपुरावे पूर्ण. नंतर बचाव पक्षातर्फे एकमेव साक्षीदार तपासण्यात आला.
> २६ ऑक्टोबर २०१७ : अंतिम युक्तिवादाला सुरुवात.
> ८ नोव्हेंबर २०१७ : दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण.
> १८ नोव्हेंबर २०१७ : आरोपींना दोषी ठरवले.
> २१ व २२ नोव्हेंबर २०१७ : शिक्षेबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद.

> २९ नोव्हेंबर २०१७ : अंतिम फैसला. तिन्ही आरोपींना जाहीर झाली फाशीची शिक्षा. आरोपींच्या नातलगांचा आक्रोश.

 

> कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे...

खरंच आज मुली सुरक्षित आहे का ?
सर्वांनी महिलांचा सन्मान केला पाहीजे. आज समाजात अनेक क्षेत्रात तरुणी आणि महिला पुरुषांच्या खाद्याला खांद्या लावून काम करत आहेत. मात्र काही संकुचित मनोवृत्तीमुळे आजही समाजात मुली आणि महिला सुऱक्षित नाही. आम्ही घरी पोहचेपर्यंत आमच्या पालकांना चिंता सतावत असते असे मत एका तरुणीने ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले.

 

सर्वत्र विचित्र वातावरण
सध्या सर्वत्र विचित्र वातावरण आहे. आधुनिक युगात युवकवर्गात नैतिक मूल्यांचा ऱ्हास जाणवत आहे. जोपर्यंत कायद्याचे रक्षक आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नाहीत तोपर्यंत कायद्याचा धाक आणि जरब निर्माण होणार नाही, अशी प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.

 

अधिकृत पोलिस चौकी हवीच
 कोपर्डी घटनेनंतर पालकमंत्री यांनी तत्त्वत: मंजुरी देत कुलधरण येथे पोलिस मदत केंद्र उभारण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्यासह पोलिस अधीक्षक यांना दिले होते. मात्र ते कागदोपत्रीच राहिले आहेत. त्यामुळे किमान या भागात एक अधिकृत पोलिस चौकी खमक्या पोलिस अधिकाऱ्यासह देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

 

तिचे स्वप्न अधुरेच
कोपर्डीतील पीडिता खेळामध्ये चपळ होती. तिला खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने आपल्याला पोलिसच व्हायचे, असे तिने ठरवले होते. त्या दृष्टीने तयारी करायची तिची मानसिक तयारीही झाली होती, असे तिचे आई-वडील सांगतात. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. इतरांना वाचविण्याचे स्वप्न पाहणारी ही कन्या स्वत:च विकृतांच्या वासनेला ती बळी पडल्याने तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले. 

 

आरोपींवर ३ वेळा हल्ला
कोपर्डी घटनेतील आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. या आरोपींना न्यायालयात आणताना दोन वेळा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘शिवबा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या आरोपींना अटक करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. हे आरोपी अद्यापही कोठडीतच आहेत.

 

दोषारोपपत्रात नंतर नोंदवला गेला कट रचल्याचा आरोप 
कोपर्डी खटल्यातील मुख्य आरोपीविरुद्ध सबळ पुरावे होते. मात्र, तपासात आणखी दोन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी सहआरोपी संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांनाही अटक केली. या दोन आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र, न्यायालयात या खटल्याचे दोषारोपपत्र दाखल करताना त्यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी स्पष्ट केले. सहआरोपींनी पीडितेवर प्रत्यक्ष बलात्कार केला नसला, तसे पुरावे नसले, तरीही तिघांनी मिळून दोन दिवसांपूर्वी पीडितेची छेड काढली होती. त्याच वेळी त्यांनी तिला ‘आपण हिला नंतर आपले काम दाखवू’ अशी धमकीही दिली होती. त्यामुळे तिघांनी मिळून कट रचून हा गुन्हा केला, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सहआरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर करताना संगनमताने कट रचणे, छेडछाड करणे, हे अतिरिक्त दोष ठेवण्यात आले. खटल्यांतील साक्षीपुरावेही त्यादृष्टीनेच तपासण्यात आले. पीडितेची ज्या क्रौर्याने हत्या करण्यात आली त्यातून समाजात अशा कृत्यासाठी कठोर शिक्षा होते हा संदेश जाणे आवश्यक असल्याचे सरकारी वकीलांनी सुनावणीच्या वेळी नमूद केले.

 

यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या
घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तिन्ही आरोपींनी पीडितेची छेड काढली होती. हा प्रकार पाहणारी पीडितेची मैत्रीण, पीडितेने सांगितलेला छेडछाडीचा हा प्रकार ऐकणारी तिची बहीण, आई, घटनेपूर्वी काही वेळ अगोदर आरोपींना घटनास्थळाच्या परिसरात पाहणारे दोन साक्षीदार, घटनेनंतर मुख्य आरोपीला तेथून पळून जाताना पाहणारे साक्षीदार, मुख्य आरोपीच्या दातांच्या ठशांचे नमुने पीडितेच्या जखमांशी जुळत असल्याचे सांगणाऱ्या दंतवैद्यकीय अधिकारी, यांच्या साक्षी या खटल्यात महत्वाच्या ठरल्या.

 

यांचेही योगदान
भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, फौजदार गजानन करेवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय संदीप पाटील, एलसीबीचे फौजदार राजकुमार हिंगोले, स्थानिक गुन्हे शाखा व मुख्यालयाचे सुमारे ५० पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक तुकडी सुरक्षा बंदोबस्ताला होती. न्यायालयातील पोलिस कर्मचारी निळकंठ चव्हाण, लक्ष्मण काशिद, किशोर भिंगारदिवे, युसूफ शेख, ए. एल. केदार, महिला कर्मचारी अर्चना कासार, यांनीही सुरक्षेसाठी कडेकोट पहारा ठेवला.

 

पुढीला स्‍लाइडवर ग्राफिक्‍सच्‍या माध्‍यमातून पाहा त्‍या दिवशी नेमके काय घडले? आणि खटल्‍याची सविस्थर माहिती...

बातम्या आणखी आहेत...