आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटी पार्क अखेर होणार सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरमधील आयटी पार्कबाबत महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअर असोसिएशनने दिलेले प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. त्यांना लवकरच संबंधित हस्तांतराबाबत चर्चेसाठी मुंबईला बोलावण्यात येईल. तशी पत्रे त्यांना आठ दिवसांत देण्यात येतील, अशी माहिती ‘जिल्हा उद्योग मित्र’च्या गुरुवारच्या बैठकीत एमआयडीसीचे विभागीय अधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

आयटी उद्योगासाठी राखीव असलेले भूखंडही त्याच उद्योगांना देण्यात येत असल्याची माहिती खेडकर यांनी दिली. ‘दिव्य मराठी’ने आयटी पार्क सुरू होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामागील अडथळ्यांबाबत वृत्तमालिकाही प्रकाशित केली होती. हा विषय सतत गाजत ठेवल्याने अखेर त्याबाबत ठोस निर्णय दृष्टिक्षेपात आला आहे. आयटी पार्क सुरू झाल्यास नगरचे अर्थकारण बदलण्याची त्यात क्षमता आहे. पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात नवीन एमआयडीसीसाठी १७७ एकर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यासाठी २८ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी १२ एकर जमीन केएसपीजी कंपनीला देण्यात आली असून, तिच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. अजून दोनशे एकर जमीन अधिग्रहणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
जमिनीची मोजणी झाल्यावर तीही ताब्यात घेण्यात येईल, बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव होते. आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. एस. गवळी व उद्योजक यावेळी उपस्थित होते. ही बैठक वादळी झाली. एमआयडीसीत झालेल्या वृक्षतोडीचा विषय अचानक वगळण्यात यावा, असा प्रस्ताव खेडकर यांनी मांडल्यामुळे वाद झाला. मुळात याबाबत स्थानिक अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने उद्योजक संतप्त झाले होते. त्यामुळे हा विषय वगळू नये, असा आग्रह उद्योजक हरजितसिंग वधवा यांनी धरला. नगरमध्ये ट्रक टर्मिनल सुरू करण्याचा त्यांनी आग्रह धरला. याआधीच्या बैठकांत त्याबाबत सकारात्मक चर्चाही झाली. मात्र, न्यायालयाची त्याला परवानगी िदली नसल्याचे कारण खेडकर यांनी सांगितले. त्यावर वाद झाला. सरकारच्या नियमाप्रमाणे ट्रक टर्मिनल असणे आवश्यक आहे, असे वधवांचे म्हणणे होते. हा विषय वगळू नये, अशी मागणी त्यांनी केली.

वधवा यांनी उपस्थित केलेले विषय वगळण्याबाबत, तसेच काही विषयांत ते विषय दुस-यांच्या नावे करण्याबाबत त्यांची व गवळी यांच्यात खडाजंगी झाली. भाळवणी येथे एक्सप्रेस फीडर असतानाही नेहमी वीज जात असल्याची तक्रार उद्योजक संतोष बोथरा यांनी केली. ‘आमी’चे अध्यक्ष अशोक सोनवणे व उद्योजक मिलिंद कुलकर्णी यांनी एमआयडीमधील टप-या अनधिकृत व अतिक्रमणात आहेत. एमआयडीसीतील वाढत्या गुन्हेगारीचे ते स्रोत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ही अतिक्रमणे काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर अधिका-यांनी त्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली.
आमदार मुरकुटे यांनी पांढरी पूल एमआयडीसीबाबत चर्चा केली. त्या ठिकाणी रस्ते, वीज, पथदिवे, पाणी या मूलभूत सुविधा देण्यासाठी वेगाने काम करण्याची मागणी केली. ‘मराठा चेंबर्स’चे प्रकाश गांधी यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली.

उद्योजकता पुरस्कारांची बैठकीत घोषणा
जिल्हा उद्योग केंद्राचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सुविरॉन इंडस्ट्रिज व दुसरा पुरस्कार प्रथमेश इंडस्ट्रिजला जाहीर झाला. या पुरस्कारांसाठी पाच अर्ज आले होते. त्यातील तीन बाद करण्यात आले. दरवर्षी तीन पुरस्कार देण्यात येतात. मात्र, यंदा तिस-या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कोणीही पात्र न ठरल्याचे सांगण्यात आले.

जमीन देण्याची शेतक-यांची तयारी
नगर तालुक्यातील शेतक-यांना उद्योगवाढीचे महत्त्व पटू लागले आहे. याची झलक या बैठकीत बघण्यास मिळाली. वडगाव गुप्ता गावातील ग्रामस्थ व उद्योजक किरण कातोरे यांनी यावेळी एमआयडीसीसाठी जमीन देण्याची तयारी दाखवून इतरांशीही चर्चा करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली.