आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षक मानगावकर निलंबित; गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपींशी तडजोड भोवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याचा ठपका ठेवत तोफखाना ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित करण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी ही कारवाई केली. शहर उपविभागाचे सहायक अधीक्षक अक्षय शिंदे यांनी गुरूवारी हा आदेश बजावला. सुमारे शंभर कोटींचा गांजा जप्त केल्यानंतर गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढवण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. 
 
तोफखाना पोलिसांनी १८ जूनला शहरात सुमारे कोटीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मुख्य सूत्रधार सीमा राजू पांचारिया, संदीप दिलीप अनभुले, सागर भीमाजी कदम, गणेश निवृत्ती लोणारी शोभा कृष्णा कोकाटे यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींकडून ८६ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी ताेफखाना ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचा गांजा पकडल्यामुळे तोफखाना पोलिसांची वाहवा झाली. 
 
या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर स्वत: करत होते. तपासात आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न झाली. ४-५ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेने मानगावकर यांना आरोपींची संख्या वाढवण्याची विनंती केली. त्यापोटी मोठी आर्थिक तडजोड झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांच्याकडे तक्रारी गेल्या. आलेल्या तक्रारीची शहानिशा करुन मानगावकर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यामध्ये तथ्य आढळल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. गुरूवारी रात्री उशिरा सहायक पोलिस अधीक्षक शिंदे यांनी हे आदेश बजावले. रिक्त झालेल्या पदावर पाथर्डीचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांची बदली करण्यात आली. पाथर्डीचा पदभार शिंगणापूरच्या पोलिस निरीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे. 
 
निरीक्षक पवार यांनी दीड वर्षे पाथर्डीचा पदभार सांभाळला. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकदा त्यांनी रोष ओढवून घेतला. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी आंदोलने झाली होती. तत्कालीन प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पकडलेले वाळूचे ट्रक परस्पर सोडून दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

 गुन्ह्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह 
जिल्ह्यातप्रथमच मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केल्यामुळे आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तपासात मोठे रॅकेट उजेडात येईल, अशी शक्यता होती. मात्र, तसे होता तपास संगमनेर नेवासे तालुक्यातच रेंगाळला. मध्यंतरी तोफखाना पोलिसांचे पथक परराज्यात तपासाला जाऊन आले. परंतु आरोपी हाती लागले नाही. त्यातच आर्थिक तडजोडीमुळे तपासी अधिकारी निलंबित झाल्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा तपास नव्याने करावा लागणार आहे. 
 
‘लाचलुचपत प्रतिबंधक’चा ससेमिरा 
पोलिसनिरीक्षक राकेश मानगावकर यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईमागे गांजातस्करीतील आरोपींशी केलेल्या आर्थिक तडजोडीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीशी अशा प्रकारे आर्थिक तडजोड करणे हा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा आहे. त्यामुळे मानगावकर यांना केवळ निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावून त्यांची सुटका होणार नाही. आता त्यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिराही लागणार आहे.  
बातम्या आणखी आहेत...