आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तत्काळ’ला एजंटांचा विळखा कायम,रेल्वेतील अधिकारी, कर्मचारी एजंटांची साखळीच कार्यरत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रवाशांना ऐनवेळी आरक्षण मिळावे, यासाठी असलेली तत्काळ आरक्षण यंत्रणा पूर्णपणे एजंटांच्या ताब्यात गेली आहे. यात थेट वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याने नावापुरती टोकन यंत्रणा असली, तरी पहिल्या पाच क्रमांकांवर एजंट घुसखोरी करत असल्याने सामान्य प्रवाशांना हातात ‘वेटिंग’चेच तिकीट पडत आहे. ऐनवेळी रेल्वेचा पोलिस नसणे, अनेकदा मागणी करूनही आरक्षण खिडक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, फक्त टोकन पद्धती सुरू असल्याचे नाटक वठवणे, यांतून दररोज मोठा गैरव्यवहार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समजली.
‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शुक्रवारी सकाळपासूनच येथे चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. तेथे एजंटांनी साध्या पेनने आकडे टाकून आधीच आरक्षण फॉर्म ठेवले होते. तत्काळ आरक्षणाची वेळ खरे, तर दहाची आहे. पण नगरच्या रेल्वे स्टेशनचे नियम वेगळे आहेत. तेथे फक्त वातानुकूलित तत्काळ आरक्षण दहा वाजता सुरू होते. साडे दहा वाजता एरवी बंद असलेल्या पहिल्या खिडकीवर प्रवाशांनी रांग लावून टोकन क्रमांक टाकून घ्यायचा.त्यावर आतील कर्मचारी पेननेच आरक्षण करण्याच्या खिडकीचा क्रमांक लिहून देतो. त्यानंतर जेव्हा टोकन क्रमांक खिडकीवर असलेल्या डिस्प्लेवर झळकेल, तेव्हा प्रवाशाने तेथे जाऊन तिकीट घेणे अपेक्षित आहे. मात्र, शुक्रवारी खिडकी क्र. एकवरील डिस्प्लेच बंद होता. शेजारील दुसऱ्या क्रमांकाच्या खिडकीवर आधीचाच ७७ ७८ हे टोकन क्रमांक शेवटपर्यंत झळकत होते.

खासएजंटांसाठी ‘सिस्टिम’
एजंटांच्या सोयीसाठी बनवलेल्या ‘सिस्टिम’मुळे दोन्ही खिडक्यांवरील साधारणत: पहिले पाच क्रमांक एजंटांनी बळकावले होते. टोकनसाठी रांग लावण्याच्या सूचना पहिल्या क्रमांकाच्या खिडकीवर लिहिलेल्या होत्या. तेथे फॉर्मचा गठ्ठा ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना असतानाही राजरोसपणे एजंटांच्या सोयीने गठ्ठा ठेवण्यात आला होता. त्यानंतर फॉर्मवरील एजंटाने लिहिलेल्या क्रमानुसार रांग लावण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. रांगेत उभे राहून फॉर्मवर टोकन क्रमांक टाकण्याचे नाटकही ठरल्याप्रमाणे वठवण्यात आले. खिडक्यांवर टोकन दिसण्याचे बोर्ड बंद असल्याने फॉर्मवर टोकन क्रमांक पडताच प्रवाशांनी शेजारी एक दोन क्रमांकाच्या खिडक्यांसमोर धाव घेतली. सुरुवातीचे एजंट त्यानंतर एक-दोन प्रवासी वगळता सर्वांच्या पदरी ‘वेटिंग’ पडले. आरक्षणासाठी आलेल्या इतरांची मात्र निराशा झाली.
अनारक्षिततिकिटासाठी

एकच खिडकी सुरू
अनारक्षित तिकिटासाठी नगरच्या स्टेशनवर दोन खिडक्यांची व्यवस्था आहे, पण येथील एकच खिडकी सुरू असते. परिणामी गाडी आली, तरी प्रवाशांना तिकीट मिळणे दुरापास्त होते. आरक्षणाच्या बाबतीतही हेच आहे. आरक्षणासाठी तीन खिडक्या आहेत. त्यापैकी एक क्रमांकाची खिडकी कायम बंद असते. दोन तीन क्रमांकाची खिडकी फक्त सकाळी सुरू असते. सायंकाळी मात्र फक्त एकच खिडकी सुरू राहते. त्यामुळे सुरू असलेल्या खिडकीवर रांगा लागतात. या खिडक्यांमधील कर्मचारी दुसरीकडे फिरत असतात, अशी प्रवाशांची तक्रार असते. अनेकदा चौकशीच्या खिडकीतील कर्मचारीही जागेवर थांबत नाही. शुक्रवारी अनारक्षित तिकीट मिळणाऱ्या खिडकीतील कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी गायब होता. अनेकदा चौकशी खिडकीतून इच्छुकांना साधा आरक्षणाचा छापील अर्जही मिळणे दुरापास्त होते. आरक्षणासाठीची टोकन पद्धत येथे सुरू झाली आहे, पण हा टोकन क्रमांक मिळण्यात कर्मचारी नसल्यानंतर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ विनाकारण वाया जातो.

रेल्वे पोलिस ऐनवेळी ‘गायब’
प्लॅटफॉर्मवररेंगाळणाऱ्या रेल्वे पोलिसांना आरक्षणाच्या ठिकाणी काय चालते, याच्याशी काहीही घेणे-देणे नसल्यासारखी स्थिती होती. मुळात तत्काळचे तिकीट महाग आहे. पण ऐनवेळी लांब जाण्याचे ठरलेले प्रवासी त्यासाठी कितीही खर्च करण्यासाठी तयार होतात. त्याचाच गैरफायदा एजंट रेल्वेतील त्यांच्या संबंधांमुळे उठवत असल्याची माहिती रेल्वेच्याच एका सुत्राने दिली. ‘तत्काळ’च्या वेळी पोलिस नसणे, आरक्षण खिडक्यांवरील टोकन पद्धतीसाठी लावलेले फलक बंद असणे, हा सर्व एका पद्धतशीर कार्यपद्धतीचा भाग असल्याची माहिती समजली. सामान्य प्रवासी कन्फर्म तिकीट मिळाल्यास फक्त तळमळ व्यक्त करत तेथून निघून जातो. तो लेखी तक्रार करण्याच्या फंदात पडत नाही. त्याचाच गैरफायदा ही साखळी घेत आहे. एजंट तिकिटावरील प्रत्येक प्रवाशामागे किमान पाचशे रुपये कमवत असल्याची माहिती समजली. त्यात रेल्वेचे काही लोकही लाभार्थी असल्याने हे सर्व राजरोसपणे सुरू आहे.
अनारक्षित तिकिटांच्या खिडकीतील कर्मचारी ऐनवेळी ‘गायब’ झाला होता. छायाचित्रे: धनेश कटारिया.

टोकन पद्धत असली, तरी एक दोन क्रमांकाच्या खिडक्यांवर लागलेल्या तत्काळच्या आरक्षणासाठी लागलेल्या रांगा. दोन क्रमांकाच्या खिडकीवरचा डिस्प्लेच बंद असल्याने टोकन पद्धतीचा काही उपयोगच नाही.
टोकन क्रमांकाच्या फलकावर खिडकी क्रमांक पाच दाखवला जात होता. खिडकी क्रमांक पाच फक्त अनारक्षित तिकीट मिळण्यासाठी आहे. फलकाच्या खाली असलेल्या छोट्या फलकावर टोकन क्रमांक १२५, तर मोठ्या फलकावर या क्रमांकाचा पत्ताच नव्हता.

एजंटाने लावली प्रवाशांची रांग
‘तत्काळ’च्या फॉर्मवर टोकन क्रमांक घेण्यासाठी चक्क नारंगी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका एजंटाने प्रवाशांची रांग लावली. त्याने हातात फॉर्मचा गठ्ठा घेऊन त्यावरील क्रमांक उच्चारत प्रवाशांना रांगेत उभे केले. नंतर तो ऐटीत पुढे उभा राहिला. त्याचा क्रमांक अर्थातच पहिल्या पाचांत होता. हे सर्व पहिल्या क्रमांकाच्या खिडकीत असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडत होते, तरीही त्याने कोणताही आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे या खिडकीच्या काचेवर "येथे फॉर्म ठेवू नका, तर रांगेत उभे रहा' अशा प्रकारच्या हिंदीत सूचना लिहिल्या आहेत. त्यांचे उघड उल्लंघन सुरू आहे.

गैरप्रकारांविरोधात उपोषण करू
^रेल्वेच्याआरक्षणातीलएजंटगिरीविरोधात मी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात सोमवारी मी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार करणार आहे. तरीही हे गैरप्रकार बंद झाले नाही, तर १५ दिवसांनी प्रवाशांसह रेल्वेस्टेशन परिसरात उपोषण केले जाईल.'' हरजितसिंग वधवा, सदस्य,रेल्वे विभागीय सल्लागार समिती.