आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा ग्राहक मंचाची विमा कंपनीला चपराक; विम्याची रक्कम देण्यास केली होती टाळाटाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली. मृत शेतकर्‍याच्या वारसांना एक लाखाची रक्कम देण्याचा आदेश ग्राहक न्याय मंचचे अध्यक्ष प्रभाकर देशपांडे व सदस्य विष्णू गायकवाड यांनी दिला.

नालेगावातील (लिंक रोड) रहिवासी अरुण बबन पवार यांच्या डोक्यात 14 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांच्या नोकराने लाकडी दांडक्याने प्रहार केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत पवार यांची नगर येथे गट नं. 66/1/5 येथे शेतजमीन होती. ते व्यवसायाने शेतकरी असल्याने शासनाच्या अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. मृत पवार यांचा मुलगा गणेश पवार याने मुंबई येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकांकडे विमा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला. मात्र, कंपनीने विमा दावा विहित मुदतीत म्हणजे पॉलिसीच्या शेवटच्या तारखेपासून 90 दिवसांत दाखल केला नाही, तसेच मृत अरुण पवार हे मृत्यूसमयी शेतकरी नसल्याने तक्रारदारास मागणीप्रमाणे रक्कम मिळण्यास पात्र नसल्याचे सांगत विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे गणेश यांनी जिल्हा ग्राहक मंचात 28 जून 2013 ला अ‍ॅड. एन. जी. काळे यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. या तक्रारीवर निकाल देत जिल्हा ग्राहक मंचने पवार यांचा मृत्यू डोक्यात दांडक्याने झालेल्या मारहाणीत रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. हा मृत्यू अपघाती आहे. मात्र, तक्रारदाराने पॉलिसीच्या अखेरच्या दिवसापासून 90 दिवसांत दावा दाखल केला नाही, म्हणून विमा कंपनीला दावा नामंजूर करता येणार नाही. या प्रकरणात तक्रारदाराच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे तक्रारदारावर आघात झाल्याने त्यातून सावरणे कठीण होते. अशा परिस्थितीत दावा उशिरा दाखल केला म्हणून विमा नाकारता येणार नाही. त्यामुळे विमा कंपनीने तक्रारदारास एक लाख रुपये द्यावे, त्यावर दावा तारखेपासून नऊ टक्के दराने व्याज द्यावे.
दावा उशिरा दाखल केल्याने नाकारला होता
- 14 नोव्हेंबर 2011 रोजी लाकडी दांडक्याने पवार यांचा करण्यात आला खून
- गट नं. 66/1/5 नुसार शासनाच्या अपघात विमा योजनेचे लाभार्थी
- 90 दिवसांत विमा कंपनीकडे दावा दाखल झाला नाही.
- 17 जून 2014 रोजी ग्राहक तक्रार मंचातर्फे निकाल जाहीर
- 18 मार्च 2013 पासून 9 टक्के दराने व्याज देण्याचे दिले आदेश
- 1 लाख रुपये तक्रारदारास नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे प्रस्ताव.
उद्देशालाच हरताळ
शेतकर्‍या चा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास मदत म्हणून शासनाने योजना सुरू केली. मात्र, कंपनीने या उद्देशालाच हरताळ फासला.
कंपनीचा निर्जीवपणा अनाकलनीय
या प्रकरणातील घटनेचा व परिस्थितीचा विमा कंपनीने गांभीर्याने विचार करणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने तक्रारदारास त्रास देण्याच्या हेतूने थातूर-मातूर कारणे सांगत तक्रारदाराचा दावा नाकारला. हे प्रकरण हाताळताना विमा कंपनीने जो यांत्रिकपणा व निर्जीवपणा दाखवला तो अनाकलनीय आहे, असे ग्राहक न्यायमंचाने निकालपत्रात म्हटले आहे.
निकालाने विमा कंपन्यांना दणका
विमा कंपन्या पॉलिसी काढताना विमाधारकाला वेगवेगळी आमिषे दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात दाव्याची रक्कम देण्याची वेळ येते. तेव्हा याच विमा कंपन्या अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करतात. या विमा कंपन्यांच्या आडमुठे धोरणाच्या वागणुकीमुळे दावा करणार्‍यांना त्रास होतो. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने दिलेल्या निकालामुळे विमा रकमेचा दावा नाकारणार्‍या विमा कंपन्यांना चांगलाच दणका बसला आहे.

(सदरील छायाचित्र केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहे.)