आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरजिल्हा बदल्यांना अजूनही मुहूर्त मिळेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ अवघ्या काही महिन्यांत संपुष्टात येणार आहे. त्रुटी दूर करून पुन्हा आयुक्तांची मंजुरी घेण्यात दीड महिना गेल्यास पदोन्नतीसह आंतरजिल्हा बदल्यांचा विषय लांबणीवर पडणार आहे. नवीन सत्ताधारीच हा विषय मार्गी लावू शकतील, अशी चर्चा जाणकार मंडळीत सुरू आहे.
उदासीन प्रशासनाने मागील तीन वर्षांत एकदाही बिंदुनामावली (रोस्टर) आयुक्तांकडून तपासून घेतली नाही. संच निश्चितीला होणारा विलंब इच्छाशक्तीचा अभाव त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे पदोन्नतीतही अडसर निर्माण झाला.

आंतरजिल्हा बदल्यांचा विषय हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. जिल्ह्यात अवघ्या १२७ रिक्त जागा आहेत, तर बदल्यांचे प्रस्ताव दीड हजारांवर दाखल आहेत. रिक्त जागांवर नियुक्ती देण्यासाठी २०७ शिक्षकांना ना-हरकत प्रमाणपत्र जिल्हा परिषदेने दिले आहे. तत्पूर्वी रोस्टर मंजुरी घेऊन पदोन्नत्या केल्यास रिक्त जागांची संख्या साडेतीनशेवर जाण्याची शक्यता आहे. या रिक्त जागांवर आंतरजिल्हाच्या शिक्षकांना नियुक्ती द्यावी, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे.

आंतरजिल्हा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चार महिन्यांपासून रोस्टर मंजूर करून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. तथापि, जिल्हा परिषदेला रोस्टर मंजुरीत यश आले नाही. यापूर्वी आयुक्तस्तरावरून रोस्टरमध्ये त्रुटी काढण्यात आल्या होत्या. त्या त्रुटी दोन महिन्यांत दुरुस्त करून पुन्हा रोस्टर मंजुरीसाठी पाठवण्यात आले. परंतु पुन्हा त्यात गंभीर चुका निघाल्या. अपंग कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र रजिस्टर, आदिवासी बिगर आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंद घेऊन जात वैधता प्रमाणपत्रेही रजिस्टरच्या अनुक्रमाप्रमाणे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयुक्तांनी त्रुटी काढल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले. पदाधिकारीही शिक्षकांसमोर तोंडघशी पडले आहेत. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्याकडे आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षक सातत्याने खेटा घालत आहेत. त्याबरोबरच काहींनी जाणकार सदस्यांकडेही फिल्डिंग लावली आहे. पण मागील सात वर्षांत एकतर्फी आंतरजिल्हा बदली होऊ शकलेली नाही.

आंतरजिल्हा बदली होत नसल्याने शिक्षकांचे कौटुंबिक जीवन अस्थिर झाले आहे. अनेक महिला शिक्षक इतर जिल्ह्यांत आहेत, तर त्यांचे पती नगर जिल्ह्यात शासकीय नोकरीत आहेत. त्यामुळे या शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शिक्षकांनी वेळोवेळी प्रयत्न केले, पण त्यांच्या पदरी निराशा पडली. आता बदल्या होण्याची आशा वाटत असतानाच आयुक्तस्तरावरून रोस्टर परत पाठवण्यात आले. या दुरुस्तीलाच महिना लागणार आहे. तेथून पुढे आयुक्तस्तरावर मंजुरीला पंधरा दिवस ते एक महिना लागू शकतो. त्यानंतर पदोन्नती करून रिक्त जागांवर आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक भरता येतील. दरम्यान, विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ काही महिन्यांत संपणार आहे. आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे पुढील सत्ताधारी आल्यानंतर मार्च २०१७ नंतरच मार्गी लागतील, असेही काही जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. या संपूर्ण गोंधळामुळे शिक्षक वैतागले आहेत.

शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या जागांवर समायोजन करण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रोस्टर मंजुरीपूर्वी आंतरजिल्हा बदल्या केल्यास प्रश्न मार्गी लागणार आहे.

पदाधिकाऱ्यांना विसर
जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे १२७ जागा रिक्त आहेत. या जागांवर आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक भरता येणे शक्य होते. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असे पत्रकारांना सांगितले होते. तथापि, पदाधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
बातम्या आणखी आहेत...