आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पावती प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्या,सामाजिक कार्यकर्ते श्याम अासावा यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने वाळू वाहतुकीसाठी बनावट पावत्या तयार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी प्रकरणातील आरोपी अद्याप फरारच आहेत. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्या मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्याम आसावा यांनी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे केली आहे. 

‘अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पावत्या’ या मथळ्याखाली “दिव्य मराठी’ ने रविवारी प्रकाशित केले होते. या बनावट पावत्या प्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गेल्या २१ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटून गेले, तरी या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. 

याबाबत “दिव्य मराठी’ शी बोलताना आसावा म्हणाले, बनावट पावत्या प्रकरणी पोलिसांनी प्रथम फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. बनावट पावती प्रकरणात शासकीय ठेकेदाराचा समावेश आहे. त्यामुळे त्या ठेकेदाराचा तातडीने ठेका रद्द करुन त्याची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी. यापूर्वी पेनद्वारे या वाहतूक पासची बनवाबनवी चालत होती. आता थेट बनावट पासच बनवल्याने वाळू तस्करांची मजल कुठपर्यंत गेली हे स्पष्ट झाले आहे. 

जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी संगमनेर, श्रीगोंदे तालुक्यात वाळू तस्कारांवर कारवाई केली, या प्रकरणातही त्यांनी लक्ष घातले पाहिजे. पोलिस अधीक्षकांनी केवळ गुन्हे दाखल करुन थांबू नये, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावे. या प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेतील लोकांचा देखील सहभाग असावा. त्या अनुषंगाने तपास होणे गरजेचे आहे. 

एकीकडे सरकार जलसंधारणाच्या कामावर मोठा खर्च करत असताना दुसरीकडे नदी पात्रांमधून वाळूची अवैध चोरी होते. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. बनावट पावती प्रकरणात आरोपी फरार दाखवला जातो. मात्र स्थानिक पोलिसांच्या संबधामुळेच हा आरोपी सापडत नाही. वाळू चोरी प्रकरणी आतापर्यंत चोरीचे गुन्हे दाखलच झाले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तातडीने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन या प्रकरणातील संशयितांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी अासावा यांनी अपर जिल्हाधिकारी पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

महसूलकडून मागवली माहिती 
पोलिसांनीबनावट पास प्रकरण उघडकीस आणणाऱ्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट दोन पानांद्वारे २० प्रश्न पाठवून देऊन माहिती मागवली आहे. हे प्रकरण अंगलट येणार असल्यामु‌ळे पोलिसांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. 

तपास सुरू 
बनावटपावतीप्रकरणी पोलिसांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांचा जबाब घेतला आहे. पोलिस या प्रकरणाचा अजून तपास करत आहेत. या बनावट पावत्या कुठून आल्या त्याचा देखील तपास करण्यात येत आहे.
- शहाजीनरपुडे, पोलिस निरीक्षक, कोपरगाव. 
बातम्या आणखी आहेत...