आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलवर लागतोय कोट्यवधींचा सट्टा; अनेकांचे जीवन उद्ध्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावण्यात येणार्‍या सट्टय़ामुळे नगर शहरातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून विविध व्यवसायात कार्यरत असणारे सुशिक्षित, तसेच सरकारी, खासगी नोकरदारही या व्यसनात गुरफटले आहेत. मोबाइल फोनवरून चालणार्‍या सट्टेबाजीचा पोलिसांना सुगावा असला, तरी कारवाईतील अडचण सट्टेबाज व बुकींच्या पथ्यावर पडत आहे. ही सामाजिक कीड दूर करण्यासाठी कोणतेही व्यापक प्रयत्न सध्या होताना दिसत नाहीत.
सावेडी परिसरात राहणारा संदीप (बदललेले नाव) एका मोबाइल कंपनीच्या शोरुममध्ये काम करतो. मित्रांच्या संगतीने सहज गंमत म्हणून तो आयपीएल सामन्यांवर सट्टा लावायला लागला. शंभर रुपये, नंतर हजार रुपये अशी गंमत म्हणून झालेली सुरुवात कधी व्यसनात बदलली हे संदीपला कळले नाही. फुकटात येणार्‍या पैशांची लागलेली चटक पुढे वाढत गेली. शोरुममधून मिळणारा पगार सट्टय़ावर खर्च झाला. सट्टय़ावर लावण्यासाठी व्याजाने पैसे काढले. आज नाही, तर उद्या जिंकू या नादात व्याजाचा डोंगर सात लाखांच्या घरात कधी गेला हे त्यालाही कळले नाही. कर्ज देणार्‍यांना तोंड चुकवत तो फिरू लागला. पैशांची मागणी करणारे घरापर्यंत पोहोचले. संदीप परागंदा झाला, पण त्याच्या आई-वडिलांना राहते घर विकून कर्जाची परतफेड करत गाव गाठावे लागले.

अशीच कहाणी सावेडीतील मोबाइल विक्रेत्याच्या बाबतीत घडली. मोबाइल विक्रीचा व्यवसाय करता करता हा विक्रेता आयपीएलसाठी सट्टा घेणारा छोटा बुकी बनला. पैशांच्या हव्यासापोटी स्वत:च्या बळावर सट्टा घेण्यास त्याने सुरुवात केली. फायदा कमी अन् तोटाच अधिक असे करत त्याच्यावरही पंधरा लाखांचे कर्ज झाले. शेवटी शहर सोडून गावाचा रस्ता या मोबाइल विक्रेत्याला धरावा लागला. मोबाइल दुकान व शहरातील घरही त्याच्या कुटुंबाला विकावे लागले.
गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात कफल्लक झालेली ही केवळ प्रातिनिधीक उदाहरणे. शहराच्या प्रत्येक भागात अशी उदाहरणे सापडतील. तेलीखुंट, सज्रेपुरा, सावेडी, पाइपलाइन रस्ता, चितळे रस्ता, टिळक रस्ता आदी भागात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणार्‍या बुकींचा सुळसुळाट आहे. सट्टा लावण्यासाठी अर्थसाह्य करणार्‍या सावकारांचीही काही कमी नाही. कुवत पाहून सावज हेरले जाते. परतफेड होण्यास टाळाटाळ सुरू झाल्यानंतर या सावकारांच्या गुंडांकडून त्रास सुरू होतो. वैयक्तिक पातळीवरील प्रकरण घरापर्यंत पोहोचते व घरच्यांनाही त्रास सुरू होतो. शिवीगाळ, धमकावणे, मारहाण या बाबी किरकोळ ठरून थेट जीवालाच धोका निर्माण करण्यापर्यंत वसुली करणार्‍यांची मजल जात आहे. कुटुंबीयांना आहे ते विकून या सावकारांची भरती करावी लागते. ग्रामीण भागातही हे लोण पोहोचले आहे.सट्टा लावणार्‍यांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने विद्यार्थी सट्टेबाजीसाठी सावकारांचे बळी ठरत आहेत.
हजारपेक्षा अधिक बुकी
आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणारे दहा मोठे बुकी नगरमध्ये आहेत. त्यांच्या अंतर्गत हजारपेक्षा अधिक छोटे बुकी आहेत. हे छोटे बुकी ग्राहकांच्या थेट संपर्कात असतात. ठरावीक कमिशन, त्यासोबतच सामन्यांचा अंदाज पाहून स्वत:च्या स्तरावर जोखीम पत्करून घेतलेल्या सट्टय़ावर छोट्या बुकींचा व्यवसाय चालतो. शंभर किंवा हजारच्या पटीत सट्टा घेतला जातो.
पालकांचे लक्ष आवश्यक
शालेय व महाविद्यालयील विद्यार्थ्यांचा सट्टेबाजीतील वाढता सहभाग चिंताजनक बनला आहे. कुसंगतीतून सट्टेबाजीकडे वळालेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. आपला मुलगा पैसे कोणत्या कारणासाठी घेतो, त्याचा विनियोग कुठे करतो, कुणाच्या संगतीत राहतो याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
वेळीच सावरलो..
सट्टेबाजीच्या नादाला लागून सर्वस्व गमावून बसलो आहे. केवळ थ्रील म्हणून झालेली सुरुवात व्यसनात बदलली. देणी मिटवता-मिटवता नाकीनव आले होते. आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र, वेळीच सावरलो. आज सर्व देणी मिटवून पुन्हा नव्याने उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचंड मानसिक, आर्थिक त्रास झाला. कुणीही या वाटेला जाऊ नये, असे वाटते.’’ समीर (बदललेले नाव), सट्टेबाजीतून सावरलेला तरुण.
अशी आहे पद्धत
प्रत्येक सामन्याच्या नाणेफेकीवर सट्टा लागतो. नाणेफेकीनंतर सामन्याच्या विजय-पराभवाचा दर मोठय़ा बुकींकडून छोट्या बुकींकडे येतो. छोट्या बुकींकडून रोजचे ग्राहक असणार्‍यांकडे दर पोहोचतात. षटकात होणार्‍या धावा, फलंदाजांकडून केल्या जाणार्‍या धावा, तसेच षटकातील प्रत्येक बॉलवर सट्टा लावला जातो. हे सर्व मोबाइलवरून होते. सट्टा लावणार्‍यांचे संभाषण बुकींकडून रेकॉर्ड केले जाते.