आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक आयपीएल सामन्यावर शहरात तीन कोटींचा सट्टा..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आयपीएल क्रिकेट स्पर्धा जसजशी रंगत चालली आहे, तसतसा क्रिकेट शौकिनांचा उत्साह वाढतो आहे. मात्र, या उत्साहाला सट्टय़ाचे गालबोट लागले आहे. प्रत्येक सामन्यावर शहरातून कित्येक कोटींच्या सट्टय़ाच्या बोली लावल्या जात आहेत. सट्टा एजंटांचा, तर शहरात सुळसुळाट झाला आहे. सट्टा लावणार्‍यांत 15 वर्षांची मुलेही आहेत. प्रत्येक सामन्यावर शहरात तीन कोटींपेक्षा जास्त बोली लावल्या जात असल्याचेही समजते.
शहरातील कट्टय़ांवर, चौकांत आणि तरुणांत सध्या फक्त आयपीएल आणि सट्टा यांचीच चर्चा आहे. नगर शहरात 150 पेक्षा जास्त सट्टा एजंट व 25 ते 30 बुकी आहेत. फोनवरून चालणार्‍या या व्यवहारांत नाणेफेक कोण जिंकेल इथपासून ते सामना कोण जिंकेल यावर बोली लावली जाते. कोणता खेळाडू किती धावा काढेल? सेशन म्हणजे पहिल्या 10 षटकांत किती धावा होतील? खेळाडू षटकार मारेल किंवा नाही? सामना सुरू असताना एका षटकात किती धावा होतील किंवा खेळाडू बाद होईल की नाही? यावरही तातडीने बोली लावली जाते.
सट्टा बाजारात ज्या संघाचा भाव कमी तो जिंकण्याची शक्यता जास्त मानण्यात येते. शनिवारी झालेल्या चेन्नई-रॉयल चॅलेंज बंगळुरू सामन्यात चेन्नईसाठी 72 पैसे, तर बंगळुरूसाठी 1.10 पैसे भाव होता. कोलकाता नाईट रायडर व सनराईज हैदराबाद सामन्यात कोलकाता 70 पैसे, तर हैदराबादसाठी 1.10 पैसे भाव होता.

रविवारी (25 मे) होणार्‍या पंजाब-दिल्ली सामन्यासाठी पंजाबला 53 पैसे, तर दिल्लीला 1 रुपया 50 पैसे भाव देण्यात आला आहे. मुंबई-राजस्थान या सामन्यासाठी मुंबईला 72 पैसे, तर राजस्थानला 1 रुपया 10 पैसे भाव देण्यात आला आहे. आयपीएल कोण जिंकणार, यासाठी चेन्नईला 1 रुपया 20 पैसे, कोलकता संघाला 5 रुपये 10 पैसे, पंजाबला 1 रुपया 30 पैसे असे भाव देण्यात आले आहेत. भाव जरी एक रुपया-पैशाच्या स्वरूपात असला, तरी रक्कम मात्र 100 रुपये किंवा त्या पटीत लावावी लागते. सट्टा एजंट फोनवरून बुकिंग घेतो. संबंधित एजंट दुसर्‍या दिवशी चारच्या आत पैसे वसुलीसाठी किंवा जिंकला असेल, तर पैसे देण्यासाठी संबंधिताला भेटतो. या एजंटांना बुकीकडून टक्केवारीनुसार कमिशन मिळते. बुकींचे लागेबांधे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथील मोठय़ा बुकींबरोबर असतात. सट्टा घेणारे एजंट व बुकींचे जाळे गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे.