आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irragation Department Issued Showcasue Notice To The Mahavitaran

भंडारदरा धरणाचा वीजपुरवठा खंडित केल्याने जलसंपदा विभागाकडून महावितरणला नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - वीजबिल थकवल्याने महावितरण कंपनीने भंडारदरा धरणाची वीज तोडल्यानंतर दुखावलेल्या जलसंपदा खात्याच्या अधिकार्‍यांनी महावितरणला प्रत्युत्तर देत भाड्यासाठी नोटीस बजावली आहे.

शनिवारी दुपारी 3.30 वाजता महावितरणच्या अधिकार्‍यांनी धरणस्थळाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर जलसंपदा विभागाने रविवारी महावितरणकडे वीज उपकेंद्राच्या भाड्यापोटी थकलेली 9 लाख 50 हजारांची थकबाकी भरण्यासंदर्भात ही नोटीस बजावली. आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज उपकेंद्राच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जलसंपदा खात्याच्या मालकीच्या जागेत भाडेतत्त्वावर भंडारदर्‍याचे वीज उपकेंद्र सुरू आहे. या ठिकाणी महावितरण, तसेच महापारेषण कंपनीने पक्के बांधकाम करून कार्यालय थाटले आहे. हे कार्यालय, तसेच वीज उपकेंद्रासाठी कराराने दिलेल्या जागेचे व्याजासह सुमारे 15 लाख रुपयांची थकबाकी जलसंपदाला महावितरणकडून येणे बाकी आहे. भंडारदरा धरणावर देखरेख करणार्‍या कार्यालयाचे प्रमुख शाखा अभियंता रामनाथ आरोटे यांनी रविवारी महावितरणच्या कार्यालयास 9 लाख 50 हजार रुपये थकबाकी व त्यावरील व्याजाची रक्कम आठ दिवसांत जलसंपादकडे जमा करण्याची नोटीस बजावली. रक्कम जमा न केल्यास महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा नोटिसीत दिला आहे. या प्रकारामुळे शनिवार रात्रीपासून धरण परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. अंधाराचा सामना पर्यटकांनाही करावा लागत आहे. नक्षली व अतिरेक्यांपासून धोका असलेल्या भंडारदरा धरणाची सुरक्षाही पणाला लागली आहे. मात्र, याचे गांभीर्य दोन्ही विभागांना दिसत नाही. धरणाची वीज खंडित करण्याचा आतापर्यंतचा हा चौथा प्रकार आहे. वीज खंडित झाल्यानंतर जलसंपदाच्या अधिकार्‍यांना जाग येते. खरे तर विजेचा नियमितपणे वापर करणार्‍या जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी वीजबिलाचा भरणा वेळेत करण्यासाठी निधीची तरतूद आधीच करणे महत्त्वाचे होते. या कारणासाठी धरणस्थळाची सुरक्षा धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. ज्या पाण्यावर प्रतिदिन 45 मेगाव्ॉट वीजनिर्मिती केली जाते, तेथील वीज देयक थकवल्याने तोडली जाते, ही लाजिरवाणी बाब आहे.


लाखोंची थकबाकी
जलसंपदाने 10 लाख 50 हजार रुपयांच्या जागाभाड्याच्या थकबाकीसाठी महावितरणला नोटीस बजावली होती, तेव्हा साडेचार लाखांचा भरणा वीज कंपनीने केला होता. आता 9 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी आणि व्याजाची अशी 15 लाख रुपयांची बाकी महावितरणकडून जलसंपदाला येणे आहे.


लाखोंची थकबाकी
जलसंपदाने 10 लाख 50 हजार रुपयांच्या जागाभाड्याच्या थकबाकीसाठी महावितरणला नोटीस बजावली होती, तेव्हा साडेचार लाखांचा भरणा वीज कंपनीने केला होता. आता 9 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी आणि व्याजाची अशी 15 लाख रुपयांची बाकी महावितरणकडून जलसंपदाला येणे आहे.


वकिलाची भेट घेऊ..
महावितरणने जागेचे भाडे थकवले आहे. आमचे येणे बाकी असताना धरणाची वीज खंडित करणे चुकीचे आहे. सुमारे 15 लाखांच्या आसपास व्याजासह महावितरणकडे थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी सोमवारी (3 जून) वकिलाची भेट घेऊन कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.’’ किरण देशमुख, उपअभियंता, जलसंपदा, अकोले.