आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक 16 शाळांना चक्क आयएसओ मानांकन, शिक्षण विभागचा सावळा गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२४ शाळा धोकादायक आहेत. तथापि, यापैकी १६ शाळांना आयएसओ नामाकंन मिळाले आहे. यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सावळागोंधळ असून या विभागाला विद्यार्थ्यांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते. 
 
नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे छत कोसळून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ ऑगस्टला घडली. या दुर्दैवी घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासनासह शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जुन्या बांधकाम असलेल्या शाळा आणि त्या शाळेतील धोकादायक वर्गखोल्यांची माहिती घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. तालुक्यातील शिक्षण विभागालाही तत्काळ निर्लेखन करण्यास सांगितले आहे. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २८१ शाळा आहेत. यात ४४ शाळा आयएसओ मानांकनप्राप्त आहेत. २८१ शाळांपैकी १२४ शाळा धोकादायक परिस्थितीत उभ्या आहेत. या १२४ धोकादायक शाळांत १६ शाळांना आयएसओ मानांकन आहे, हे विशेष. 
 
२८१ शाळांत १०१३ खोल्या आहेत. या १०१३ वर्गखोल्यांत ७९१ वर्गखोल्या वापरण्यासाठी योग्य आहेत. २१७ खोल्या जुन्या दगडी बांधकाम असल्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. भविष्यात निंबोडीसारखी दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी जिल्हा परिषदेसह कर्जत पंचायत समिती आणि शिक्षण विभागाने या गंभीर बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पावसामुळे धोकादायक असणाऱ्या शाळा इमारती, खोल्या जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने त्या शाळा आणि वर्गखोल्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. निंबोडीच्या दुर्घटनेमुळे पालकही आता शाळाइमारतीबाबत जागरूक झाले आहेत. 

दरम्यान, निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांसह शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मुख्याध्यापकांचा संबंध नसतो. त्यामुळे गुन्हा कोणाचा आणि माथी कोणाच्या अशी चर्चा शिक्षकांत आहे. 
 
यांना मिळाले आयएसओ नामांकन 
जोगेश्वरवाडी,नांगरेवस्ती, पठारवाडी, पाटेवाडी, चांदे खुर्द, थेटेवाडी, कर्जत मुले मुली, चखालेवाडी, खांडवी, कोंभळी, शिवाचा मळा, नांदगाव, रुईगव्हाण, घुमरी, निमगाव गांगर्डा. 
 
१०२ खोल्यांची गरज 
जिल्हापरिषद शाळांतील पटसंख्या वाढत आहेत. नवीन शिक्षण पद्धतीनुसार जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत. कर्जतच्या शिक्षण विभागाला अजून १०२ वर्गखोल्याची आवश्यकता आहे.  
- उज्ज्वला गायकवाड, गटशिक्षणाधिकारी. 
 
आयएसओ देताना खोल्यांचा दर्जा पाहा 
आएसओदेताना भौतिक सुविधांऐवजी इमारती वर्गखोल्यांचा दर्जा पहायला हवा. याबाबत शासनाने विचार करायला पाहिजे, असे मत एका पालकाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...