आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० कोटींच्या कामांसाठी पाच ठेकेदारांची "रिंग', निम्म्यापेक्षा अधिक कामे ठरावीक ठेकेदारांकडे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेत नोंदणीकृत ७१ ठेकेदार असताना शहरातील मूलभूत सुविधांची तब्बल १४० कामे केवळ दहा ठेकेदारांनी मिळवली आहेत. त्यात २५ लाखांपेक्षा अधिक रकमेची निम्म्यापेक्षा अधिक कामे पाच ठेकेदारांना देण्यात आली आहेत. या ठेकेदारांनी रिंग (संगनमत) करून निविदा भरल्या असून त्यास महापालिका प्रशासनासह स्थायी समितीनेदेखील मंजुरी दिली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी तक्रारअर्ज दिल्यानंतर राज्य शासनाने अहवाल मागवला. परंतु हा अहवाल सादर करण्याऐवजी प्रशासनाने ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्याची तयारी सुरू केली आहे.

मूलभूत सुविधांसाठीचा ४० कोटींचा निधी त्यातून होणारी १४० कामे पुन्हा एकदा वादात सापडली आहेत. या कामांसाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल ४० कोटींची १४० कामे जाणीवपूर्वक ठरावीक ठेकेदारांना देण्यात आली आहेत. दहा ठेकेदारांनी संगनमत करून निविदा सादर केल्या होत्या. विशेष म्हणजे संगनमत करून सादर करण्यात आलेल्या या निविदांबाबत प्रशासनाने कोणताही आक्षेप घेतला नाही. आयुक्त दिलीप गावडे यांनी आपल्या अधिकारात २५ लाखांपेक्षा कमी रकमेच्या निविदा मंजूर केल्या. त्यात केवळ पाच ठेकेदारांनाच कामे देण्यात आली आहेत. २५ लाखांपेक्षा अधिक रकमेची कामेही इतर पाच ठेकेदारांनाच देण्यात आली आहेत.

कोट्यवधींची कामे मिळवणाऱ्या या ठेकेदारांनी रिंग करून निविदा भरल्या. एका कामासाठी कमी-अधिक दराने या निविदा सादर करण्यात आल्या. ज्या ठेकेदाराला काम घ्यायचे, त्याने इतर दोन ठेकेदारांपेक्षा कमी दराने निविदा भरली. संगनमत करून त्यांनी निविदा दरही आपसात ठरवले होते. महापालिकेत नोंदणीकृत ७१ ठेकेदार असताना केवळ १० ठेकेदारांनाच १४० कामे का देण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार अर्ज दिला आहे. नगरविकास विभागाने शेख यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत मनपा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. शहर अभियंत्यांनी आयुक्तांच्या मंजुरीने प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानंतरचा अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त गावडे यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखाधिकारी लेखापरीक्षकांना दिले आहेत. अंतिम अहवाल अद्याप शासनाला सादर करण्यात आलेला नाही, उलट संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

या ठेकेदारांकडे मोठी कामे
ए. सी. कोठारी, ए. पी. साेनीमंडलेचा, ए. जी. वाबळे, बेस्ट कन्स्ट्रक्शन, ए. सी. शेख.

निविदा रद्दची मागणी
"मूलभूत'मधील कामांचीनिविदा प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबवण्यात आली आहे. ठरावीक ठेकेदारांनाच कामे मिळावीत, यासाठी प्रशासन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच संबंधित ठेकेदारांनी संगनमत करून निविदा भरल्या. मनपात ७१ ठेकेदारांची नोंद असताना केवळ आठ-दहा ठेकेदारच निविदा प्रक्रियेत सहभागी झाले. निविदा रद्द करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.'' शाकीर शेख, सामाजिककार्यकर्ते.

या ठेकेदारांकडे छोटी कामे
राजेंद्र लोणकर, सुनील राऊत, निमिटस् प्रमोटर्स, इम्रान जहांगीर, अाय. जी. शेख, ए. सी. कोठारी, बेस्ट कन्स्ट्रक्शन.

अटी-शर्ती "रिंग'साठीच
सार्वजनिक बांधकामकडे नोंदणी केलेल्या ठेकेदाराला मनपा हद्दीतील कामांसाठी निविदा भरण्याचा अधिकार आहे. परंतु मर्जीतल्या ठेकेदारांनाच कामे मिळावीत, यासाठी प्रशासनाने अटी-शर्ती लागू केल्या. महापालिका हद्दीतील कामांची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराची मनपाकडे स्वतंत्र नोंद करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठरावीक ठेकेदार वगळता इतरांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.
बातम्या आणखी आहेत...