आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेस अद्याप वेग येईना, १४० अतिक्रमणे हटवली- प्रशासनाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका प्रशासनाने गाजावाजा करत सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अद्याप गती आलेली नाही. तीन दिवसांत १४० लहान-मोठी अतिक्रमणे हटवल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अधिकारीदेखील या मोहिमेकडे फिरकायला तयार नाहीत. कारवाईसाठी घेतलेल्या जेसीबीला एका तासासाठी तब्बल ८५० रुपये मोजावे लागत आहेत. ही मोहीम केवळ वरवरची असल्याचे सध्या चित्र आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होऊन तीन दिवस उलटले, परंतु गोरगरीब व्यावसायिकांच्या टपऱ्या उचलण्याशिवाय कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. मोठ्या अतिक्रमणांना महापालिकेने हात लावलेला नाही. उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेसाठी ३५ कर्मचारी, जेसीबी डंपर असा लवाजमा आहे. भाडेतत्वावर घेतलेल्या जेसीबीसाठी दर तासाला तब्बल ८५० रुपये भाडे महापालिकेला मोजावे लागत आहे.

तीन दिवसांत १४० अतिक्रमणे हटवण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला. परंतु एका ठिकाणी कारवाई करून मोहिमेतील पथक दुसऱ्या ठिकाणी जाताच अतिक्रमणधारक पुन्हा ठाण मांडतात. त्यामुळे अतिक्रमण मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही मोजके कर्मचारीच ही मोहीम राबवत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र माेहिमेकडे पाठ फिरवली आहे.

बुधवारी तारकपूर बसस्थानक परिसर, जिल्हा रुग्णालयाची मागील बाजू, न्यू आर्टस महाविद्यालय, अप्पू चौक आदी भागात कारवाई करण्यात आली. पेमराज सारडा महाविद्यालयाजवळ पहिल्याच दिवशी कारवाई करण्यात आली होती. परंतु तेथे पुन्हा टपऱ्या उभ्या करण्यात आल्या. त्या हटवण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना बुधवारी सायंकाळी संबंधितांच्या शिव्यांचा मार खावा लागला. अतिक्रमण हटाव मोहिमेत महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. परंतु पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्याने पथकातील कर्मचारी कारवाई करण्यास मागे हटत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ नावापुरतीच सुरू आहे.
मध्यवर्ती भागात अडचणी
अतिक्रमणविभागप्रमुख सुरेश इथापे हे मोहिमेच नेतृत्व करत आहेत. परंतु पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्याने ते हतबल झाले आहेत. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहिमेकडे पाठ फिरवल्याने मोहिमेतील इतर कर्मचाऱ्यांचे अवसान गळाले आहे. आतापर्यंत कारवाईला विरोध झाला नसला, तरी मध्यवर्ती शहरात कारवाईदरम्यान मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे. परंतु पुढे कारवाई मागे पुन्हा जैसे थे अशीच परिस्थिती सध्या आहे.

खमकी भूमिका घ्यावी
उपायुक्तचारठाणकर यांनी शहरातील लहान-मोठ्या सर्वच अतिक्रमणांच्या विरोधात सुरूवातीला खमकी भूमिका घेतली होती. त्यात पार्किंग नसलेल्या रुग्णालयांचादेखील समावेश होता. परंतु राजकीय हस्तक्षेप इतर अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे चारठाणकर अतिक्रमण हटाव मोहिमेकडे फारसे लक्ष देण्यास उत्सुक नाहीत. मोठ्या अतिक्रमणधारकांच्या विरोधात सर्वच महापालिका अधिकाऱ्यांनी खमकी भूमिका घेण्याची आवश्यकता अाहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
बातम्या आणखी आहेत...