नगर- राज्यातीलदूध संकलनात गेल्या महिन्यांत ३० लाख लिटरची घट झाली आहे. जिल्ह्याच्या दूधसंकलनातही दररोज लाख ६० हजार लिटरची घट झाली आहे. टंचाईच्या काळात आतापर्यंत दूधधंद्याने कायम शेतकऱ्यांना हात दिला आहे. पण सरकारच्या धोरणांमुळे दूधउत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ स्वाभिमानी दूध उत्पादक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
ऐन पावसाळ्यात ही स्थिती प्रथमच ओढवली आहे. आतापर्यंत दुष्काळी स्थितीत दूधधंद्यात मिळणाऱ्या उत्पन्नामुळे नगरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी तग धरून राहिला. यंदा मात्र राज्य सरकारने या व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे. राज्यात तीन महिन्यांपूर्वी दररोज सुमारे कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होत होते. आता ते ९० लाख लिटरपर्यंत घसरले आहे. त्यामुळे दररोज सहा कोटींचा, तर महिन्याला १८० कोटींचा फटका दूधधंद्याला बसत आहे.
घटहोण्याची कारणे
कोकणवगळता उर्वरित राज्यात यंदा सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. नगरसारख्या जिल्ह्यात पावसाची टक्केवारी त्याहून कमी आहे. कारण या टक्केवारीत जास्त वृष्टी होत असलेल्या अकोले तालुक्यातील आकडेवारीचा समावेश आहे. परिणामी जनावरांना हिरवा चारा अजिबात मिळत नाही. शेतकऱ्यांचा कणा मोडल्याने तो उसाशिवाय दुसरे सकस खाद्य जनावरांना घालू शकत नाही. फक्त ऊस खाऊन जनावरे कुपोषित झाली आहेत. त्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे.
दूधउत्पादकांना अनुदान द्या
कर्नाटकराज्य दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देते.
आपले प्रगतशील म्हणवणारे राज्य मात्र दूध उत्पादकांची लूट करण्यात मग्न आहे. महिनाभरात दुधाचा सरकारी दर तीन रुपयांनी वाढून तो २० रुपये झाला, पण तो खूप कमी आहे. सध्या चाऱ्याचे पशूखाद्याचे दर वेगाने वाढत आहेत. ते पाहता दूध उत्पादकांना अनुदान मिळणे आवश्यक आहे. पुढील टंचाईच्या काळात हाच व्यवसाय शेतकऱ्यांना जगवू शकतो, असे डेरे यांचे म्हणणे आहे.
पाण्यापेक्षादुधाचा दर कमी
सध्यापाण्याच्या बाटलीचा दर आहे २० रुपये. ४१ रुपये प्रतिलिटर उत्पादन खर्च असलेल्या दुधाला मात्र सरकारी २०, तर खासगी संस्थांकडून १८ रुपये ५० पैसे दर मिळत आहे. सरकारने दूध उत्पादकांना पूर्ण वाऱ्यावर सोडले आहे. कारण गायीच्या दुधाचा दर २० रुपये निश्चित केला असला, तरी शेतकऱ्यांना तो कोठेच मिळत नाही, अशी भयावह स्थिती आहे. दुधाला दर नसल्याने जनावरे विकण्यास गेलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी बाजारातही निराशाच पडत आहे. कारण जनावरांचे दर निम्म्याने उतरले आहेत.
शेतकऱ्यांच्याश्रमाचे मूल्य शून्य
दूधउत्पादनाचा खर्च प्रतिलिटर सुमारे ३५ रुपये आहे. राज्यात सध्याचा दूध खरेदीचा सरकारी दर २० रुपये, तर खासगी दूध संस्थांचा दर १८ रुपये ५० पैसे आहे. शेतकरी या धंद्याकडे जोडधंदा म्हणून पाहतात. आपल्या शेतात निघणाऱ्या चाऱ्याचा आपल्या कष्टांचे मूल्य ते खर्चात गृहित धरत नाहीत, म्हणून ते इतका कमी दर स्वीकारतात. वास्तविक पाहता नगरच्या पांजरापोळ संस्थेने दूध उत्पादनाचा खर्च काढला होता, तो प्रतिलिटर ४१ रुपये १५ पैसे आहे. यावरून दूध उत्पादकांची कशी लूट होते, ते स्पष्ट होते.
शेतकऱ्यांबरोबरग्राहकांचीही लूट
दुधाच्यादराबाबत फक्त शेतकऱ्यांचीच लूट होत नाही, तर ग्राहकांचीही लूट होत आहे. कारण गेल्या तीन वर्षांत ग्राहकांसाठी गायीच्या दुधाचे दर चार रुपयांनी, तर म्हशीच्या दुधाचे दर १० रुपयांनी वाढले. मात्र, ग्राहकांना द्यावा लागणार दर दूध उत्पादकांना मिळणारा दर यात निम्म्याचा फरक आहे. म्हणजे याही धंद्यात मधल्या लोकांचे उखळ पांढरे होत असल्याचे स्पष्ट होते. नगरमध्ये जे खासगी दूध उत्पादक स्वत: ग्राहकांना थेट दुधाचे वितरण करतात, त्यांच्याकडील गायीच्या दुधाचा दर ३५ ते ४०, म्हशीचा ६० ते ६५ रुपये लिटर असा आहे.
गेल्या तीन महिन्यांतील दूध संकलन (लाख लिटर)
महिनामे जून जुलै ऑगस्ट
संकलन २३.३४ २२.७४ २१.७४ २१.४३
जनावरांच्या किमती आल्या निम्म्यावर...
सध्याऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीने कहर केला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे बाजारात आणत आहेत. त्यांचे दर मात्र निम्म्यांवर आले आहेत. विशेष म्हणजे या जनावरांना शेतकरी ग्राहक नाहीत, तर गुजरातचे व्यापारी आहेत. ते येथून स्वस्तात जनावरांची खरेदी करून ती गुजरातमध्ये चढ्या दराने विकत आहेत. गेल्या वर्षी ज्या संकरित गायीचा दर ८० हजार रुपये होता, ती आता ३५ ते ४० हजारांना विकली जात आहे. शेतकऱ्यांनाही जनावरांची विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण दुष्काळी परिस्थितीत चाराच उपलब्ध नाही.
दुधाचे दर वाढवण्याची गरज
सध्यावाढत असलेले पशू खाद्याचे दर पाहता शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा दर २५ रुपये प्रतिलिटर करण्याची गरज आहे. गेल्या तीन महिन्यांत सरकीच्या पेंडीचा भाव दोन हजार रुपये क्विंटलवरून २४०० रुपये झाला आहे. पशूखाद्यातही प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. कडबा हिरवा चारा अजिबात मिळत नाही. दरवाढीबरोबरच शेतकऱ्यांना प्रतिलिटर अनुदानही देण्याची गरज आहे.'' गुलाबरावडेरे, अध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ.