आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांच्या छुप्या लुटीमुळे मोबाइलधारक हैराण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मोबाइलकंपन्यांच्या छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या लुटीमुळे ग्राहक हैराण झाले अाहेत, अशी तक्रार मोबाइलधारक संघटनेने केली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) नुकताच शहरात ग्राहक जागरुकता कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यशाळेत जिल्हा मोबाइल टेलिफोनधारक उपभोक्ता संघटनेच्या वतीने ट्रायचे विभागीय प्रमुख शिबिचेन मॅथ्यू यांना निवेदन देण्यात आले तसेच मोबाइल कंपन्यांविषयी असलेल्या विविध तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.

या कार्यशाळेला ट्रायच्या बंगळुरू क्षेत्रीय कार्यालयाचे संयुक्त सल्लागार ले. कर्नल मनीष राघव, तसेच वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर हेही उपस्थित होते. यावेळी मोबाइलधारक संघटनेच्या वतीने अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी मॅथ्यू यांना निवेदन देत तक्रारी केल्या. अलीकडेच केंद्र सरकारने पॉर्न साइट्सवर बंदी आणली होती, पण त्यासंदर्भात झालेल्या वार्तांकनामुळे लहान मुलेही पॉर्न म्हणजे काय? असा सवाल विचारू लागली. सर्च इंजिनांवर शोध घेताना जाहिरातींमध्ये अश्लीलतेचा भरणा असतो. त्याचा कौटुंबिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असून अशा जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी वधवा यांनी केली.
बीएसएनएलच्या वतीने रिंगटोनऐवजी रात्री ते सकाळी या वेळेत मोफत कॉलची जाहिरात मनस्ताप वाढवणारी असून ती लवकरात लवकर बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. या सुविधेचा व्यापारी वर्ग ज्यांना गरज नाही, त्यांना इतर सूट देण्याची मागणी करण्यात आली. युनिनॉर कंपनीच्या मोबाइलधारकाला फोन लावल्यास समोरचा व्यक्ती उपलब्ध असो अथवा नसो, तरीही जाहिरात ऐकावी लागते. अशा स्वरुपाच्या जाहिराती त्वरित थांबवाव्यात, अशी मागणीही वधवा यांनी यावेळी केली.

कंपनीच्या वतीने मिळणाऱ्या बिलासंदर्भात किंवा इंटरनेट पॅकसंदर्भात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना स्वत: मोबाइलवर तपासण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी कंपनीच्या वतीने होणारी बिलासंदर्भात किंवा इंटरनेट पॅकसंदर्भात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना स्वत: मोबाइलवर तपासण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी करण्यात आली. मोबाइल टॉवरच्या लहरींनी होणारे आजार त्या टॉवरचे किरणांची क्षमता याची स्पष्ट सूचना करण्याची मागणी करण्यात आली.

जाहिरातबाजी आवरा
विविधकंपन्यांच्या मार्केटिंगचे इतर ई-मेल खासगी ई-मेल अकाउंटवर येत असतात. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण मनस्ताप त्यांची फसवणूक हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जाहिरातबाजी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करुन कडक नियम करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेक मोबाइल धारकांनी डू नॉट डिस्टर्ब सेवा सुरु केलेली असली, तरीही त्यांना दहा अंकी नंबरवरुन टेलिकॉल्स येतात. त्यामुळे अशा पद्धतीने ग्राहकांना मनस्ताप देणाऱ्या कंपन्यांवर वचक म्हणून दंड आकारावा, अशी मागणी करण्यात आली.

ग्राहकांची छुपी लूट मोबाइल कंपन्यांनी थांबवावी...
हल्लीबहुतांश नागरिकांकडे अँड्रॉइड प्रणालीवर आधारित असलेले मोबाइल आहेत. अशा फोन्समध्ये विविध अॅप्स डाऊनलोड केले जातात. सुरुवातीला असे अॅप्स मोफत असल्याचे सांगितले जाते. नंतर छुप्या पद्धतीने हे अॅप्स वापरण्याचे शुल्क आकारले जाते. याबद्दल ग्राहकांना कल्पना दिली जात नाही. सुरुवातीला अॅप्स डाऊनलोड करत असताना दिलेल्या करारामध्ये याबद्दल सांगितलेले असते, पण मोबाइलधारक घाईघाईने अॅप्स डाऊनलोड करुन मोकळा होतो. नंतर भुर्दंड बसायला लागल्यावर त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा स्वरुपाच्या लुटीला आळा घालण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.