नगर- महापौर निवडणुकीसाठी शिवसेनेने गेल्या तीन महिन्यांपासून मांडलेला डाव भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या गटाने शुक्रवारी उधळून लावला. काँग्रेस आघाडीचा पाठिंबा घेत गांधी गटाने महापौर उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत एकतर्फी समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. गांधी गटाने ऐनवेळी केलेला हा वार शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या महापौर, उपमहापौर निवडणुकीचे चित्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी बदलले. भाजपच्या नऊ नगरसेवकांना गृहित धरत शिवसेनेने सत्तेचे स्वप्न पाहिले. त्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळाचे गणितही शिवसेना नेत्यांनी सोडवले. परंतु खासदार दिलीप गांधी यांच्या गटातील नगरसेवकांनी शिवसेनेचे हे स्वप्न उधळून लावण्यासाठी मोठा राजकीय डाव मांडला. काँग्रेस आघाडीचा पाठिंबा घेत चक्क महापौर उपमहापौरपदावरच गांधी गटाने दावा केला. गांधी गटातील नगरसेविका नंदा साठे यांनी महापौरपदाचा, तर श्रीपाद छिंदम यांनी उपमहापौरपदाचा अर्ज शुक्रवारी दाखल केला.
राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, महापौर अभिषेक कळमकर आदी यावेळी उपस्थित होते. शहराच्या राजकारणातून शिवसेनला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आघाडीनेही गांधी गटाला विनाशर्त पाठिंबा दिला.
शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार सुरेखा कदम गुरूवारीच
आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. परंतु गांधी गटाचे नवीन आव्हान उभे राहिल्याने त्यांना शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. शिवसेना उपनेते अनिल राठोड, संपर्क नेते भाऊ कोरगांवकर, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या बाजूने असलेल्या भाजपच्या आगरकर गटातील दत्ता कावरे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. महापौर निवडणुकीतील हे नवे राजकीय समीकरण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शहर विकासासाठी भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विशेष म्हणजे हा निर्णय स्थानिक पातळीवरचा असून त्यात वरिष्ठांचा काहीच संबंध नसल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे संपर्क नेते भाऊ कोरगावकर यांनी शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचे स्पष्टीकरण दिले. एकूणच गांधी गटाने ऐनवेळी नवे राजकीय समीकरण मांडल्याने महापौरपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यात कोण बाजी मारणार ते मात्र तीन दिवसांनंतरच स्पष्ट होईल.
खासदार दिलीप गांधी यांच्या गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महापालिकेत "कमळ' फुलण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. आतापर्यंत "धनुष्या'च्या टोकावर, "घड्याळा'च्या काट्यावर हाताच्या "पंजा'वर चाललेला महापालिकेचा कारभार नगरकरांनी पाहिला. सध्या केंद्रात राज्यात सत्ता असलेल्या भाजपला मनपाच्या सत्तेत नेहमीच दुय्यम स्थान मिळाले. शहर भाजपत असलेले गटा-तटाचे राजकारणच त्याला कारणीभूत आहे. यावेळी मात्र या गटा-तटामुळेच मनपात "कमळ' फुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे महानगराध्यक्षपद मिळालेले खासदार गांधी यांनी त्यासाठी मोट बांधली, तीदेखील अवघ्या चार-पाच नगरसेवकांच्या भरवशावर. त्यांची ही मोट उचलण्यासाठी ऐनवेळी काँग्रेस आघाडीचे नेते धावून आले आहेत. त्यातून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे नवे समीकरण महापालिकेच्या राजकारणात तयार झाले आहे. हे समीकरण किती दिवस टिकणार, हा संशोधनाचा विषय असला, तरी सध्या शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये तिकीटवाटपावरून मारामारी झाल्याचे नगरकरांच्या स्मरणात आहे. मारामारीचा फटका निवडणुकीत बसला. पक्षाचे जेमतेम नऊ नगरसेवक निवडून आले. त्यातही दोन गट पडले. त्यातील गांधी गटाने आता महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न खरे ठरले, तर महापालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलेल. कमळ फुलल्यानंतर त्याचा सुगंध थेट काँग्रेस राष्ट्रवादीपर्यंत जाणार आहे. शिवसेनेसाठी मात्र हा दुर्गंध ठरेल. येत्या तीन दिवसांत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. त्यात गांधी गट शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यानंतरच महापालिकेचा कारभार धनुष्याच्या टाेकावर की, "कमळा'च्या सुगंधात चालणार ते स्पष्ट होईल.
सेना नेते आगरकरांच्या भेटीला
महापौर-उपमहापौरपदाचेअर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना नेते भाऊ कोरगावकर, अनिल राठोड, अनिल शिंदे, संभाजी कदम, भाजपचे दत्ता कावरे आदी अॅड. अभय आगरकर यांच्या घराकडे रवाना झाले. गांधी गटामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर आगरकर यांच्या घरी बराच वेळ चर्चा झाली. आहे ते संख्याबळ कसे सांभाळता येईल, यावर शिवसेना नेत्यांची चर्चा झाली. भाजपच्या गांधी गटातील नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यासाठीची व्यूहरचनाही यावेळी करण्यात आली.
काँग्रेस तातडीची बैठक
काँग्रेसचेपक्षनिरीक्षक शिरीष चौधरी यांनी शुक्रवारी रात्री काँग्रेस नगरसेवक पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यांनी सद्यपरिस्थितीचा आढावा घेत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांिगतले. भाजपच्या गांधी गटाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे बैठकीत नगरसेवकांनी स्पष्ट केले. त्यास चौधरी यांनीही हिरवा कंदील दाखवला असल्याचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. चौधरी हे लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
"राष्ट्रवादी'मध्ये उत्साह
गांधीगटाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आघाडीमध्ये शुक्रवारी चांगलाच उत्साह होता. गांधी गटाच्या नगरसेविका नंदा साठे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. ऐनवेळी शिवसेनेचा डाव उधळल्याने या नेत्यांच्या चेहऱ्यावर चांगलेच समाधान दिसत होते. संग्राम भय्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
शिवसेनेची गाडी पंक्चर
शिवसेनेनेआघाडीला खिंडार पाडत अनेकांना सहलीवर पाठवले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, तसेच भाजपचे नगरसेवक या सहलीत सहभागी होते. महापौर निवडणुकीसाठी आवश्यक असलेले संख्याबळ शिवसेनेने महिनाभरापूर्वीच पूर्ण केले होते. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात सहभागी होण्यासाठी अनेकजण तयार होते. परंतु आता आमची गाडी फुल्ल झाली आहे, असे शिवसेनेचे नेते आत्मविश्वासाने सांगत होते.
बंडखोरांची अडचण वाढली
काँग्रेसचेसंजय लोंढे, मुदस्सर शेख, राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे, मनसेच्या सुवर्णा जाधव वीणा बोज्जा यांच्यासह अनेकजण शिवसेनेच्या गोटात सामील झाले आहेत. पक्षातून बंडखोरी करत शिवसेनेच्या गोटात दाखल झालेल्या नगरसेवकांसमोर गांधी गटामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीच्या दिवशी गैरहजर राहण्याच्या बोलीवर शिवसेनेत गेलेल्या या नगरसेवकांना आता मतदान करण्यासाठी आग्रह होणार आहे. त्यामुळे या नगरसेवकांची चांगलीच गोची होणार आहे.