आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-पुणे पॅसेंजर रेल्वे लवकर सुरू करावी, सल्लागार समितीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर-पुणेदरम्यान पॅसेंजर गाडी सुरू करावी, तसेच पुणे-गोरखपूर पुणे-लखनौ या गाड्यांना नगर स्टेशनवर थांबा मिळावा, अशा मागण्या नगरच्या रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत गुरुवारी करण्यात आल्या. रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अशोककुमार उपाध्याय यांनी या मागण्यांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

नवनियुक्त सल्लागार समितीची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत सर्व प्रथम नगर ते पुणे पुणे ते नगर अशा दोन पॅसेंजर गाड्यांची मागणी करण्यात आली. नगरमधील हजारो विद्यार्थी पुण्यात शिकत आहेत. दर आठवड्यात ही मुले घरी येत असतात. त्यावेळी शुक्रवारपासून सोमवारपर्यंत त्यांना एसटीच्या बसमध्ये जागाही मिळत नाही. एसटीच्या बसच्या संख्यावाढीलाही आता मर्यादा आल्या आहेत. शिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने आल्याने वाहतूक कोंडी प्रवासाला लागणाऱ्या वेळेत मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीत नगर-पुणे रेल्वे अतिशय उपयुक्त ठरून विद्यार्थ्यांना पुण्यात राहण्याची गरज राहणार नाही. रात्री मुले घरी आल्याने पालकांची काळजी कमी होणार आहे. या शिवाय अनेक जण पुण्याहून ये-जा करतात, त्यांचीही सोय होईल. त्यामुळे नगरहून सकाळी सहा वाजता पुण्यातून सायंकाळी नगरला रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या गाड्यांना प्रवासी मिळण्याची कोणतीही अडचण नाही, तसेच त्यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.

‘दिव्य मराठी’ने सातत्याने उपस्थित केलेल्या आरक्षणातील गोंधळ, तसेच तत्काळ आरक्षणातील एजंटाचे वर्चस्व, छोट्या स्टेशनांवर एजंटांनी केलेला कब्जा, रेल्वेत घुसखोरी केलेल्या अनधिकृत खाद्य विक्रेत्यांनी निर्माण केलेला आरोग्याचा प्रश्न यांबाबत मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर उपाध्ये यांनी स्वत: गुरुवारी स्टेशनमधील आरक्षण व्यवस्थेत त्रुटी आढळल्याचे कबूल केले. या त्रुटी दूर करून प्रवाशांची गैरसोय होऊ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीला रेल्वेचे उपस्टेशन प्रबंधक दास, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. सुधा कांकरिया, उद्योजक विजय इंगळे, विश्वनाथ पोंदे, सी. ए. रवींद्र कटारिया, अशोक कानडे, एस. यू. खान, श्रीपाद शहाणे, जगदाळे यांच्यासह नगर विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. के. गांधी, मुख्य आरक्षण पर्यवेक्षक ए. एस. पूरकर आदी उपस्थित होते.

सदस्य देणार सामाजिक योगदान
सल्लागारसमितीच्या सदस्यांनी सामाजिक योगदान म्हणून बैठकीच्या भत्त्याची रक्कम वर्गणी म्हणून गोळा केली. त्यात भर टाकून स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था निर्माण करण्याचे ठरले. या शिवाय स्टेशनचा परिसर हिरवागार करण्यासाठी सदस्यांनी वृक्षारोपण त्यांची जोपासना करण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला.

फलक नादुरुस्त
आरक्षणाच्या वेळी गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी टोकन व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, टोकन क्रमांक खिडकी क्रमांक दाखवणारे मुख्य दोन्ही फलक नादुरुस्त आहेत. या फलकांवर गुरुवारी आरक्षण खिडक्यांचे क्रमांक पाच ३१ असे दिसत होते. पाच क्रमांकाची खिडकी अनारक्षित तिकीट विक्रीसाठी आहे. ३१ क्रमांकाची खिडकीच अस्तित्वात नाही.

नगरच्या रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची पहिली बैठक गुरुवारी नगरमध्ये विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अशोककुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत झाली.

रेल्वे स्टेशनवरील आरक्षण व्यवस्थेसाठी असलेले मुख्य फलक गुरुवारीही नादुरुस्त होते. त्यावर आरक्षण खिडक्यांचे क्रमांक चुकीचे होते.

‘दिव्य मराठी’च्या मागणीला बळ
‘दिव्यमराठी’ने सन २०१२ पासूनच नगर-पुणे असा थेट रेल्वेमार्ग उभारणीची मागणी सातत्याने लावून धरली आहे. नवीन लोहमार्ग होण्याची प्रक्रिया किचकट असली, तरी सध्याच्या मार्गावरूनही किमान नगर-पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास तिचाही नगरकरांना मोठा फायदा होणार आहे. शिवाय त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काही अंशी कमी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...