आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विघ्नहर्ता आला तरीही खड्ड्यांचे विघ्न कायम,खड्ड्यांच्या पॅचिंगचे काम निकृष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गणेशोत्सवातही खड्ड्यांचे विघ्न दूर झाल्याने नागरिक महापालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. खड्ड्यांच्या पॅचिंगचे काम सुरू असले, तरी ते निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पॅचिंग झाले, तेथील कचखडी रस्त्यावर सर्वत्र पसरते अाहे. गणेशोत्सवापूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजवणे आवश्यक होते, परंतु या कामास उशिरा सुरूवात झाल्याने नागरिकांना खड्ड्यांना तोंड देतच गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे.

गणेशोत्सव हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा उत्सव असतो. देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. उत्सवकाळात नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. यंदा मात्र प्रशासनाला याचा विसर पडला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, अशी नगरकरांची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. गणरायांचे आगमन झाले, तरी खड्ड्यांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

खड्ड्यांचे पॅचिंग करण्याचे काम ठेकेदार संस्थेमार्फत सुरू आहे. त्यासाठीची निविदा स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली. परंतु ठेकेदार संस्था मनमानी पध्दतीने पॅचिंगचे काम करत असून त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. खड्डे बुजवताना डांबराचा वापर करता केवळ कचखडी टाकण्यात येत आहे. काही ठिकाणी तर अक्षरश: माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे पुढे खड्डे बुजवण्याचे काम सुरू मागे पुन्हा खड्डे उघडे पडत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येत असलेली खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे दुचाकीचालकांची मोठी तारांबळ उडते. कचखडीवर दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात होतात.

मिरवणूक मार्गावरील खड्डे प्राधान्याने बुजवण्यात येत आहेत, परंतु तेथेही अशीच परिस्थिती आहे. उत्सवकाळातही खड्ड्यांचे विघ्न दूर झाल्याने नागरिक महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. देखावे पाहण्यासाठी जिल्हाभरातील नागरिक गर्दी करतात. त्यांच्यासमोरही खड्ड्यांचे प्रदर्शन होणार असल्याने मनपाच्या कारभाराचे वाभाडे निघणार आहेत. पॅचिंगच्या दर्जाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, खड्डे चांगल्या पध्दतीने बुजवावेत, अशी नगरकरांची मागणी आहे.

पॅचिंगच्या निकषांना ठेेंगा
पॅचिंगचेकाम कसे असावे, याबाबत काही निकष आहेत. खड्ड्यातील धूळ माती काढून तो स्वच्छ करणे, त्यावर रोलिंग करणे, कचखडीवर गरम डांबर टाकणे, नंतर रोलर फिरवणे अशा तांित्रक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. परंतु ठेेकेदार संस्था यापैकी कोणतेच निकष पाळताना दिसत नाही. मनमानी पध्दतीने खड्डे बुजवण्यात येत असताना महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पॅचिंगच्या कामावर खर्च होणारे लाखो रुपये पुन्हा वाया जाणार आहेत.

उपनगरातही दुरवस्था
सावेडी,केडगाव, मुकुंंदनगर, नागापूर- बोल्हेगाव या उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या भागात अनेक मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. सावेडी उपनगरात अनेक मंडळे मोठे देखावे उभारतात. हे देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. परंतु या भागातील खड्डे अद्याप तसेच आहेत. मध्यवर्ती शहरात पॅचिंग सुरू असले, तरी उपनगरात मात्र अद्याप एकही खड्डा बुजवलेला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...